*पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त श्री विनॉय कुमार चौबे यांचा विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांशी थेट संवाद!!*
सुस :
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या *‘ड्रग-फ्री पिंपरी-चिंचवड’ या महत्त्वपूर्ण जनजागृती अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्हर्च्युअल टाऊनहॉल कार्यक्रमामध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते*. युवकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रेरित करणे तसेच जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर यांच्या अध्यक्षतेखाली बावधन पोलीस स्टेशनच्या सब-इन्स्पेक्टर मोहिनी थोपटे यांच्या सहकार्याने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश आत्मसात केला.
या व्हर्च्युअल टाऊनहॉलमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. विनॉय कुमार चौबे (IPS) यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी ‘X’ (Twitter) या सोशल मीडिया माध्यमातून #DrugFreePimpriChinchwad या अभियानांतर्गत व्यसनमुक्ती, युवकांची जबाबदारी, सायबर सुरक्षितता, कायद्याची अंमलबजावणी तसेच समाजातील जनजागृती यासंदर्भातील विविध प्रश्न विचारले. आयुक्त श्री. चौबे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक, सविस्तर व प्रेरणादायी उत्तरे देत युवकांनी शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक विचारसरणीच्या माध्यमातून व्यसनाला ठामपणे नकार देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बावधन पोलीस स्टेशनच्या सब-इन्स्पेक्टर सौ. मोहिनी थोपटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. *”नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरज नाही. ‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पनेद्वारे पोलीस प्रशासन नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचत असून, समाजाशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले.* तसेच पोलिस यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास सज्ज असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्व अधिक दृढ झाले.
या संवादामुळे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर कारवाई, पोलिस प्रशासनाची भूमिका आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात युवकांचे योगदान याबाबत सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनीही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करत व्यसनमुक्त भारत घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन , नियोजन व अंमलबजावणी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे , ज्युनिअर कॉलेज चे H.O.D . सचिन खोडके तसेच श्री. ज्ञानेश्वर मोरे यांच्या सहकार्याने गुगल मीट, प्रोजेक्टर व इतर आवश्यक तांत्रिक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण होऊन सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली.





















More Stories
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त औंधमध्ये वृक्षारोपण
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा संपन्न….
*पीएमसी आणि पीसीएमसी परिसरातील वाढत्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सीएनजी-पीएनजी च्या पायाभूत सुविधा बळकट करण्याची एमएनजीएलची योजना*