September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

एप्रिल महिना ‘आंबेडकर मंथ’ म्हणून साजरा करणेबाबत सरकारशी पत्रव्यवहार करावा, सुनील माने यांची शरद पवार यांना विनंती

पुणे ता. १० (प्रतिनिधि) :

दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ मंडेला मंथ साजरा केला जातो. याच धर्तीवर भारतात एप्रिल महिना ‘आंबेडकर मंथ’ साजरा करावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली.   

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जगातले एक महत्त्वाचे नेते आणि भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले पहिले विदेशी नागरिक, डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिकेत प्रतिवर्षी ‘मंडेला मंथ’ आयोजित केला जातो. या महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील काळ्या समाजाच्या प्रगतीसाठी सरकारने, समाजाने काय केले पाहिजे त्यासंदर्भात चर्चा केली जाते. वेगवेगळे समाज घटक आत्ता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आर्थिक, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रात किती मागे आहेत ? किती जण पुढे गेले ? समाजाने, सरकारने यासाठी काय केलं पाहिजे? याबाबत व्यापक चर्चा केली जाते. दक्षिण आफ्रिकेत ही एक महत्वपूर्ण कृती केली जाते अशी माझ्यासारख्या अभ्यासकाची एक नम्र भावना आहे.

भारत हा ६००० जातीपातींमध्ये, विविध भाषांमध्ये, प्रांतांमध्ये विभागला गेलेला देश आहे. या वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये जे मागे राहिलेले घटक आहेत, त्यांच्या विकासासाठी बाबासाहेबांनी संविधान तयार करून सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम केलं. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, नेल्सन मंडेलांच्या स्मरणार्थ ज्या पद्धतीने ‘मंडेला मंथ’ एक महिनाभर साजरा केला जातो त्याच पद्धतीने भारतात एप्रिल महिना ‘आंबेडकर मंथ’ साजरा करावा असे मला वाटते. 

दक्षिण आफ्रिकेत या महिन्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ, मागास राहिलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चर्चा करतात, उपाय सांगतात. सरकार त्यांनी सांगितलेले उपाय अमलात आणते. त्याच पद्धतीने भारतात या पुढच्या काळात एप्रिल महिन्यात आंबेडकर मंथ असं सरकारने जाहीर करावं. या महिन्यात वेगवेगळ्या तज्ञांनी यावर विषय मांडावेत, उपाय सुचवावेत आणि सरकार आणि समाज यांनी देश पुढं कसा घेऊन जाता येईल याबाबत विचार करावा. सामाजिक, धार्मिक, आर्थिक दृष्टीने मागे असलेल्यांना पुढे घेऊन जाऊन बरोबरीत कसे आणता येईल या दृष्टीने विचार करून थेट उपाययोजना कराव्यात अशी मला एक नम्र सूचना करावीशी वाटते. याबाबत आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्याचे सुचवावे अशी विनंती माने यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

                                —————————————————-

 

You may have missed