September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*सूस शाखेतील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व भव्य स्वागत*

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचालित पेरीविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सूस शाखेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 ची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि आनंदमय वातावरणात करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशीच संपूर्ण परिसरात नवचैतन्य, आनंद आणि नवीन सुरुवातीचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. “हसत-हसत शाळेत चला, शाळेचा आज पहिला दिवस झाला!” या घोषवाक्याने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.

सकाळपासूनच विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन सुरू झाले आणि सर्व विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध पद्धतीने तसेच आपुलकीने स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित assembly घेऊन त्यामध्ये शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या हस्ते शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रार्थना, शिस्तपालनाचे महत्त्व तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणादायी संदेश शाळेच्या प्राचार्या यांच्याकडून देण्यात आला.
विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच टिळक लावून आणि गुलाबपुष्प देऊन पारंपरिक व स्नेहपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी, सुरक्षितता आणि सकारात्मकता निर्माण झाली. नवीन गणवेशातील विद्यार्थी आनंदाने आणि उत्साहाने शाळेत परतले होते.

या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, विभागप्रमुख श्री. सचिन खोडके, तसेच समन्वयक सौ. नेहा माळवदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नवीन वर्ग, शिक्षक आणि शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणाशी लवकर जुळवून घेता यावे यासाठी ज्येष्ठ विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली, ज्यामुळे त्यांचा पहिलाच दिवस आनंददायी आणि आत्मविश्वासपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला.

हा संपूर्ण कार्यक्रम शिस्त, आनंद आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हेच या दिवसाचे यश होते. सर्व विद्यार्थी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरित आणि उत्सुक दिसत होते.

या भव्य स्वागत समारंभाचे आयोजन हे शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुशल नियोजनाने उपमुख्याध्यापिका योगिता ढाणे पर्यवेक्षिका सौ. नेहा माळवदे व श्री. सचिन खोडके यांच्या समन्वयातून आणि सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. पहिल्या दिवशीचा हा विद्यार्थी स्वागताचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

शैक्षणिक वर्ष 2026–27 ची ही सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आनंददायी आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारी ठरली असून, संपूर्ण शाळा परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

You may have missed