April 2, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“शिक्षणातून घडवतेय भवितव्य… शिवानी बांदल यांना ‘प्रभात सुपर वुमन २०२६’चा मानाचा बहुमान” !!

पुणे, दि. ३० :

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘प्रभात नारी सन्मान २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या संचालिका शिवानी बांदल यांना ‘प्रभात सुपर वुमन २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शिवानी बांदल यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

दैनिक प्रभात तर्फे आयोजित या सोहळ्यात शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या निवड प्रक्रियेत कार्याची गुणवत्ता, समाजावर होणारा सकारात्मक परिणाम आणि नेतृत्वगुण यांचा विचार करण्यात आला.

*शिवानी बांदल यांनी चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे* त्यांच्या दूरदृष्टी आणि सक्षम नेतृत्वामुळे संस्थेच्या विविध शाखांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. आज पेरीविंकल शाळेचे रूपांतर हे पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये होण्यास शिवानी बांदल यांचे योगदान खूप मोलाचे आहे.

जर्मनी मधून उच्च शिक्षण घेऊन तिकडे अनेक संधी उपलब्ध असून सुद्धा केवळ भारतात या शिक्षणाचा व तंत्रज्ञान यांचा संगम साधून भारतातील पिढी सक्षम बनवणे या हेतूने या पावले उचलत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर जीवनमूल्ये, नैतिकता, शिस्त, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे नाव उंचावले आहे.

या प्रसंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शाखांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवानी बांदल या वयाने सर्वात लहान असूनही या सुपर वूमन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवानी बांदल यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत आपले विचार व्यक्त केले. आजच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून, समाजातील परिवर्तनामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुरस्कार स्वीकारताना शिवानी बांदल यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की,

“हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब असून, तो माझ्या संपूर्ण टीमच्या आणि संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारीची जाणीव झाली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी पुढेही अधिक जोमाने कार्य करत राहीन.”

या सन्मानामुळे चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून, संपूर्ण संस्थेमध्ये अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.