February 28, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बावधन आणि सूस च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी राज्यभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन आणि सूस शाखेत आज शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

पेरीविंकल शाळेच्या आवारात आज मराठी राज्यभाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा अभिमान, तिची परंपरा, साहित्यवैभव आणि आधुनिक काळातील महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन व वंदन करून दीपप्रज्वलनाने झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषेचा इतिहास, तिची उत्पत्ती, संत साहित्याची परंपरा तसेच आधुनिक साहित्यिकांचा प्रभाव यावर माहितीपूर्ण व प्रभावी भाषणे सादर केली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांसारख्या महान साहित्यिकांच्या कार्याचा उल्लेख करून मराठी भाषेची समृद्धी अधोरेखित करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी “मराठी माझी मायबोली”, “राजभाषा माझा अभिमान” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादरीकरण, भावगीत, समूहगीत, मराठी भाषेवरील लघुनाटिका आणि वकृत्व स्पर्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. बावधन शाखेत लघुनाटिकांमधून दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वाढता वापर, तिचे जतन व संवर्धन करण्याची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली. बावधन शाखेतून इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी जगा आणि जगू द्या या नाटुकल्यातून झाडांचे महत्व आणि पर्यावरणाचे जतन अतिशय प्रभावीपणे स्पष्ट करण्यात आले.
प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी मराठी वर्णमाला, म्हणी व सुविचार सादर करून सर्वांची मने जिंकली, तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे जागतिक स्तरावरचे महत्त्व स्पष्ट केले. “जगात कोणतीही भाषा आत्मसात करा; परंतु आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगा,” हा संदेश ठळकपणे देण्यात आला.

शाळेच्या प्राचार्या मा. सौ. निर्मल पंडित यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करण्याचे व तिच्या समृद्ध साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांना भाषाप्रेमाची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व देखणे होते. रंगमंच सजावट, आकर्षक फलक, मराठी साहित्यिकांची माहितीफलक प्रदर्शनी यामुळे कार्यक्रमाला विशेष उठाव प्राप्त झाला. याचे श्रेय नक्कीच कला शिक्षक प्राजक्ता पिल्ले व शिवराज कदम यांना जाते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासपूर्ण सहभाग आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाची प्रेरणा देत, भाषाभिमान जागवणारा आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणारा हा मराठी राज्यभाषा गौरव दिन सोहळा सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या सहयोगाने संस्मरणीय ठरला. सूस आणि बावधन परिसरात मराठी भाषेच्या गौरवाचा संदेश देणारा हा उपक्रम खरोखरच मायभूमीप्रति अभिमानास्पद ठरला असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक सायली गायकवाड, शिरीन काझी,नेहा माळवदे, सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव व इव्हेंट हेड योगिता ढाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. बावधन शाखेत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे योजना जाधव तर सूस शाखेत कृष्णा अंभूरे यांनी केले.