February 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा जल्लोष!!! – शिवजयंती उत्साहात साजरी

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या पिरंगुट शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शौर्य, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाने भारलेला भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर भगव्या पताकांनी, आकर्षक सजावटीने आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अत्यंत श्रद्धाभावाने करण्यात आली. दीपप्रज्वलन आणि मंगलाचरणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लाठी-काठी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना अक्षरशः थरारून सोडले. त्यांच्या हालचालींमधील शिस्त, ताकद आणि आत्मविश्वासातून शिवकालीन शौर्याची जाणीव प्रत्येकाला झाली.

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘शिवप्रताप’ या नृत्याविष्काराने कार्यक्रमात विशेष रंग भरला. या नृत्यातून महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि स्वराज्य स्थापनेच्या अदम्य जिद्दीची प्रभावी झलक पाहायला मिळाली. ताल, वेशभूषा आणि अभिनय यांचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

तसेच पोतदार सर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने सभागृहात ऊर्जा निर्माण केली. त्या गगनभेदी स्वरांतून महाराजांच्या सिंहगर्जनेचा प्रत्यय सर्वांना आला. प्रत्येक ओळीतून स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रुजताना दिसत होती.

प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सहभागी होत सादर केलेले आकर्षक वेशभूषा प्रदर्शन हा कार्यक्रमाचा आणखी एक गोड आणि भावनिक भाग ठरला. त्यांच्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने भारावून गेली.

संपूर्ण शाळा लाठी-काठी, शिवप्रताप नृत्य आणि पोवाड्याच्या उत्साही वातावरणाने भारलेली होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि उत्साह झळकत होता. 

या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल , शिवानी बांदल तसेच सर्व शाखा समन्वयक सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. मुख्याध्यापिका सौ. आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामवेद हाऊसचे शिक्षक, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, स्वाभिमान, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ झाली. शिवजयंतीचा हा सोहळा केवळ उत्सव न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा, संस्कारांचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जिवंत अनुभव ठरला. विद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत या कार्यक्रमाने एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी अध्याय जोडला.