पाषाण :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पाषाण परिसरात भव्य जनसंवाद पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या पदयात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेदरम्यान सुतारवाडी परिसरातील माता-भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करत आपुलकी व्यक्त केली, तर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. नागरिकांकडून मिळणारे प्रेम आणि विश्वास हे गेल्या काही वर्षांतील कार्याची पोचपावती असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
पाषाणच्या प्रत्येक गल्लीतून आणि घराघरातून मिळणारा प्रतिसाद हा केवळ राजकीय पाठिंबा नसून, विकासकामांवर असलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि तरुणाईच्या डोळ्यांतील विकासाची स्वप्ने ही सुतारवाडी व पाषाण परिसराला आदर्श, सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी प्रेरणा देणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना उमेदवारांनी स्पष्ट केले की, निवडणूक ही केवळ सत्तेचा मार्ग नसून जनसेवेची मोठी जबाबदारी आहे. पाषाण आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक ०९ च्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था आणि नियोजित वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ हवा, शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा, सुसज्ज नागरी आरोग्य केंद्रे तसेच अत्याधुनिक उद्याने विकसित करण्याचा मानस असल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच, प्रभागातील सुरक्षिततेसाठी प्रगत पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे विस्तृत जाळे उभारण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
या जनसंवाद पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. गणेश कळमकर, श्री. लहू बालवडकर यांच्यासह इतर अधिकृत उमेदवार आणि शेकडो समर्पित कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाषाणच्या संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले