February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

३० वर्षांची निष्ठा, तरीही उमेदवारी नाकारली; विशाल गांधिले यांची भावनिक भूमिका

बाणेर :

“गेली तब्बल ३० वर्षे मी भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. या परिसरात भाजपचे अस्तित्व निर्माण व्हावे म्हणून माझ्या सहकाऱ्यांसह पक्षाची पहिली शाखा स्थापन केली,” असे सांगत ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते विशाल गांधिले यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्ष आणि वेदना मांडल्या.

त्या काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही स्वतःच्या गरजा, सुखसोयी आणि भवितव्य बाजूला ठेवून प्रस्थापितांशी एकहाती संघर्ष करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदीच्या वयात घर, कुटुंब आणि संसाराकडे दुर्लक्ष करून जवळपास ३० वर्षे अहोरात्र पक्षबांधणीसाठी झटत राहिलो. आंदोलनं, संघर्ष, उपेक्षा आणि अपमान सहन करताना अनेकदा माझ्यावर गुन्हे दाखल झाले, तरीही पक्षावरची निष्ठा आणि विश्वास कधीही ढळला नाही, असे त्यांनी सांगितले.

मात्र, इतक्या दीर्घ आणि निष्ठावान सेवेनंतरही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला सलग चार वेळा उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले — २००७, २०१२, २०१७ आणि २०२६. प्रत्येक वेळी मेरिट, अनुकूल परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा असूनही माझ्या वाट्याला केवळ प्रतीक्षा आणि वेदना आल्या, अशी खंत विशाल गांधिले यांनी व्यक्त केली.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचे सांगत, संघसंस्कार माझ्या रक्तात भिनलेले आहेत. त्यामुळे कितीही अन्याय झाला, संधी नाकारल्या गेल्या तरी संघाच्या विचारधारेच्या विरोधात जाण्याचा विचार कधीच मनात आला नाही, असे त्यांनी नमूद केले.

भाजपकडून भरलेला अर्ज पुढे उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रूपांतरित झाला असता, तो अर्जही पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून, जड अंतःकरणाने पण शिस्तीत मागे घेतला. “पद महत्त्वाचे नाही, सत्ता महत्त्वाची नाही — संघ, पक्ष आणि विचारधारा माझ्यासाठी सर्वांत वरची आहे,” अशी ठाम भूमिका विशाल गांधिले यांनी मांडली.

या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि पक्षातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.