बाणेर :
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची तत्वत: मान्यता मिळाली असून, या निर्णयामुळे सूस व म्हाळुंगेसह पुणे शहराच्या पश्चिम भागाला दिलासा मिळणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरासह सूस व म्हाळुंगे या भागात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वस्तीमुळे पिण्याच्या पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक होती. याच पार्श्वभूमीवर, यापूर्वी पुणे शहराच्या उत्तर भागासाठी भामा-आसखेड धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात तत्कालीन विरोधी पक्षनेते नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुळशी धरणातून सूस म्हाळुंगेसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्याची मागणी लेखी स्वरूपात मांडली होती.
या मागणीची दखल घेत अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात मुळशी धरणातून वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेस्टेज पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडला. टाटा हायड्रो पॉवर कंपनीला सोलर व पर्यायी ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देत, पिण्याचे पाणी पुणे शहरासाठी वापरण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत, यासाठी लवकरच समिती नेमून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे जाहीर केले होते. अखेर, राज्य मंत्रिमंडळाने मुळशी धरणातून सुस व म्हाळुंगेसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागाला पाणी देण्याच्या योजनेला तत्वत: मंजुरी दिली आहे. तसेच, नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांबाबत पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते व घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व अधिकार पुणे महानगरपालिकेकडे देण्याचा निर्णयही पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्तक्षेपामुळे शासन स्तरावर घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुस व म्हाळुंगेसह पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.
सुस टेकडीवर वाॅटर झोन
सुस गावातील सर्वे नं. २१६ येथील टेकडीवर १० ते १५ एकर क्षेत्र ‘वॉटर झोन’ म्हणून आरक्षित करण्याचा प्रस्तावही पुढे आला असून, ही टेकडी तळजाई टेकडीपेक्षा उंच असल्याने येथून संपूर्ण पुणे शहराला गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
“सूस व म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकवस्ती आणि पाणीटंचाई लक्षात घेता मुळशी धरणातून पाणी आणण्याची आवश्यकता आम्ही सातत्याने मांडत होतो. आज राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला तत्वत: मंजुरी दिल्याने आमचा पाठपुरावा सफल झाला आहे. उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळेच हा निर्णय शक्य झाला, असे मी ठामपणे सांगू इच्छितो. मुळशी धरणातील वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेस्टेज पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करण्याचा निर्णय हा अत्यंत लोकहिताचा आहे. यामुळे सूस, म्हाळुंगे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.”
-बाबुराव चांदेरे
मा.अध्यक्ष- स्थायी समिती, पुणे मनपा
“पुणे शहराच्या पश्चिम भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल टाकले गेले आहे. मुळशी धरणातून पाणी आणण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने मांडत होतो. अखेर या मागणीला मान्यता मिळाल्याने समाधान वाटते. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून प्रभावी पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. हा निर्णय भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घेतलेला दूरदृष्टीपूर्ण निर्णय असून, पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.”
-दत्तात्रय धनकवडे
माजी महापौर, पुणे मनपा



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!