महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिमाखात सोहळा संपन्न!!
बावधन (पुणे) :
समाज, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा आणि सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा बावधन–कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी बावधन येथे अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाला नवी ऊर्जा मिळाली.
राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित आणि सलील कुलकर्णी – संदीप खरे प्रस्तुत ‘आयुष्यावर बोलू काही’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. तब्बल २००० प्रयोगांचा टप्पा पार केलेल्या या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली. ४००० ते ५००० लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, नगरसेविका अल्पना वर्पे, आणि डॉ.श्रद्धा प्रभुणे याच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पुरस्कार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी सहकार, सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात विशेष ठसा असणारे बावधन मधील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राजेंद्रजी बांदल यांना “शिक्षणरत्न” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत, समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. अशा पुरस्कारांमुळे सामाजिक कार्याला प्रेरणा मिळते, असे सांगून आयोजक दिलीप वेडेपाटील यांनी बावधन मध्ये क्रीडांगण, बगीचा, नाट्यगृह व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा केलेल्या मागण्यांचे अल्पावधीतच पूर्ण करू असे त्यांच्या भाषणात सांगितले.
या सोहळ्यास केंद्र व राज्य शासनातील मंत्री, आमदार, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
यानंतर सादर झालेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमात शुभंकर कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून जीवनातील संघर्ष, आशा, सकारात्मकता आणि श्रद्धेचे महत्त्व अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने मांडले. कधी हास्य, कधी डोळ्यांत पाणी आणणारे दमलेल्या बाबाची कहाणी यामुळे मंत्री महोदय व संपूर्ण सभागृह भारावून गेले.
कार्यक्रमाचे नियोजन, संयोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी दीर्घकाळ टाळ्यांच्या गजरात कलाकार, पुरस्कारप्राप्त मान्यवर आणि आयोजकांचे कौतुक करण्यात आले.
या यशस्वी पुरस्कार सोहळ्यासाठी आयोजक दिलीप वेडपाटील , शैलेश वेडेपाटील व राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने व बावधन खुर्द व बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थ आणि प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. बावधन–कोथरूड भूषण पुरस्कार हा केवळ सन्मान न राहता, समाजघडवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला मान्यता देणारा आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारा सोहळा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी