August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चैतन्य विद्या प्रतिष्ठान पुस्तकांच्या सहवासात ज्ञानाची नवी वाट : पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सूस आणि बावधन शाखेची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

पुणे :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बावधन आणि सूस या दोन्ही शाखेतून वाचनाची आवड जोपासावी, ज्ञानाचा व्यापक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण व्हावी, या उद्देशाने परिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता नववीचे व पाचवीचे विद्यार्थी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रविवार पासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिव्हलमधील पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी सहभागी झाले होते.

 

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ – १३ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर (Fergusson College Ground) आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या तिसऱ्या आवृत्तीत ८०० हून अधिक स्टॉल्स, लेखक संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘शांतता.. पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमांतर्गत गिनीज रेकॉर्डचा प्रयत्न केला जाणार आहे.

वाचकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये तब्बल ८०० पुस्तक स्टॉल्स असून ५० लाखांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमधील साहित्य, विज्ञान, इतिहास, आत्मचरित्र, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी कथा तसेच शैक्षणिक पुस्तकांचा समृद्ध खजिना येथे पाहायला मिळत आहे.

या शैक्षणिक उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नियोजनाने विद्यार्थ्यांसोबत कृष्णा अंभोरे, स्मिता श्रीवास्तव , वैशाली कुलकर्णी व विशाल टाकमोघे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तक स्टॉल्सना भेट देत आपल्या आवडीनुसार पुस्तके चाळली, काही विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी केली, तर अनेकांनी लेखकांविषयी आणि पुस्तकनिर्मिती प्रक्रियेबाबत माहिती घेतली. पुस्तकांची भव्य मांडणी आणि विषयांची विविधता पाहून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी उत्सुकता वाढल्याचे दिसून आले.

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेतील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे विशेष व्याख्यानही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, योग्य पुस्तक निवड आणि पुस्तकांमधून मिळणाऱ्या जीवनमूल्यांविषयी मार्गदर्शन केले. या भेटीतून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तक प्रदर्शन पाहण्याचा अनुभवच नव्हे, तर वाचनसंस्कृतीची जाणीव आणि विचारांची नवी दिशा मिळाली.

हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि स्मरणीय अनुभव ठरला असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र बांदल यांनी केले.

या संपूर्ण पुस्तक प्रदर्शन भेटीचे आयोजन हे शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक सचिन खोडके, सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

 

You may have missed