February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस–नांदे आरपी रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न, आमदार शंकर मांडेकर, बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांना यश…

सूस :

सूस–नांदे आरपी रस्त्यावर सनीज वर्ल्ड परिसरातील चढउतार कमी करून रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार शंकर मांडेकर आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे नव्याने समाविष्ट गावांतील या रस्त्याचे काम सुरु करण्यास मार्ग मोकळा झाला.

या कामाचे भूमिपूजन भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यापूर्वी अजितदादा पवार यांनी वेळ काढून प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत वाहतुकीचा अभ्यास, साईट मोजमाप, उतार–चढाव, भविष्यातील वाहतूक वाढ, धोकादायक वळणे अशा सर्व बाबींचा सखोल आढावा घेतला होता. कामाची गुणवत्ता, वेळेत अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य ही त्यांची विशेष कार्यशैली असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून आले.

सनीज वर्ल्ड समोरील भागातील धोकादायक चढउतार कमी होऊन अधिक रुंद, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता उभारला जाणार आहे. या कामामुळे सूस, नांदे व परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी सुलभता मिळणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, कार्यालयीन वेळेतील वाहतूक, व्यापारी दळणवळण याला गती मिळून अपघाताचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहतूक सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि तांत्रिक उपाययोजनांबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिले.

समारंभास मान्यवरांची उपस्थिती

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, शिवाजीराव काळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते, नांदे गावच्या माजी सरपंच निकिता रानवडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, नामदेवराव चांदेरे, माजी सरपंच प्रशांत रानवडे, विशाल विधाते, निलेश पाडाळे, मनोज बालवडकर, माजी सरपंच अंजना चांदेरे,पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अभिजीत आंबेकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील व असंख्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी महत्त्वाचे सहकार्य केलेल्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, तसेच पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे विशेष आभार असल्याचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.