बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, बावधन कॅम्पस येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान, विज्ञान आणि व्यावहारिक शिक्षणाचा संगम साधणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालदिनाचे औचित्य साधून, इयत्ता ११वी व १२वीतील विद्यार्थ्यांसाठी विंग्ज एव्हिएशन टेक्नॉलॉजी, शिवणे या अत्याधुनिक वैमानिक प्रशिक्षण संस्थेस भव्य शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत विद्यार्थ्यांना विमानचालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उड्डाणाची यंत्रणा, सुरक्षा प्रक्रिया, नेव्हिगेशन प्रणाली आणि भविष्यातील करिअर संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची दुर्लभ संधी मिळाली. त्याचप्रमाणे
अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटरचा प्रत्यक्ष अनुभव, कॉकपिट, ऑटोपायलट, ATC सिस्टम यांची सविस्तर माहिती, विमानातील सुरक्षा प्रक्रिया, हवामान विश्लेषण, नेव्हिगेशन प्रणालीचे प्रात्यक्षिक
पायलटिंग, एव्हिएशन इंजिनिअरिंग, एव्हिएशन मॅनेजमेंटवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, १५ पेक्षा अधिक करिअर संधींचा सखोल आढावा, इंजिन मॉडेल, टूल्स, विमानाची बाह्य/आंतरिक तपासणी यासारखे प्रत्यक्ष प्रयोग दाखविण्यात आले व हे सर्व विद्यार्थ्यांना अगदी जवळून अनुभवता आले.
जागतिक एव्हिएशन उद्योगातील वाढत्या संधींचे भविष्यदर्शन हे या भेटीमागील प्रमुख उद्दीष्ट होते.
नव्या पिढीमध्ये एव्हिएशनविषयी वाढती आवड — ‘आम्हालाही वैमानिक होता येईल!’ हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभवून आला.
शैक्षणिक सहलीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटर. सिम्युलेटरमध्ये विद्यार्थ्यांना टेक-ऑफ, लँडिंग, हवामानाचे निरीक्षण, उड्डाणाच्या प्रक्रियेतील निर्णय घेणे, आपत्कालीन हाताळणी यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विमानातील प्रमुख यंत्रणा — कॉकपिट कंट्रोल, कम्युनिकेशन सिस्टिम, इंजिन ऑपरेशन, नेव्हिगेशन रूट-प्लॅनिंग याचा सविस्तर परिचय करून दिला.
त्याशिवाय विमानाची आंतरिक रचना, विमानतळातील ग्राउंड हँडलिंग, सुरक्षा तपासणी, देखभाल विभाग (MRO), एअरक्राफ्ट मेकॅनिक्स, एव्हिएशन सेफ्टी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
एव्हिएशन क्षेत्रातील संभाव्य करिअर पर्यायांविषयी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनात पायलटिंगसोबतच इंजिनिअरिंग, तांत्रिक सेवा, व्यवस्थापन, सुरक्षा, ड्रोन ऑपरेशन्स अशा विविध शाखांचा विस्तार विद्यार्थ्यांनी अनुभवला.
विद्यार्थ्यांना भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या उच्च शिक्षण कार्यक्रमांची माहितीही देण्यात आली.
या भेटी दरम्यान विद्यार्थ्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला व त्यांनी त्यांचे मत व विचार स्पष्ट केले.
“फ्लाइट सिम्युलेटरमध्ये बसणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले! असे अनिश शिंदे – इ. ११वी या विद्यार्थ्याने सांगितले तर “आज आम्ही विमानाचे नियंत्रण कसे केले जाते हे तंत्रज्ञानासह अनुभवलं. आता पायलट होण्याचे स्वप्न अधिक जवळ वाटत आहे.” असा दृढ विश्वास रुद्राक्ष तनपुरे – इ. ११वी याने मनोगतातून सांगितले
व “ATC आणि नेव्हिगेशन पाहून विज्ञानाची व्यावहारिक बाजू कळली.” असे सायली दुर्गुले – इ. ११वी तील विद्यार्थिनीने सांगितले असून
“एव्हिएशन क्षेत्र किती विस्तृत आहे हे आजच्या मार्गदर्शनामुळे स्पष्ट झाले असे मत सर्व विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
तसेच शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांनी हा विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानाशी जोडणारा उपक्रम असून पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणे ही आजची काळाची गरज आहे. एव्हिएशनसारख्या जागतिक पातळीवरील क्षेत्राची ओळख विद्यार्थ्यांना लवकर झाली तर त्यांच्या करिअरची दिशा अधिक स्पष्ट होते असे सांगून ही सहल विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि ज्ञानात वाढ करण्यासाठी नक्कीच प्रेरित ठरेल असे मत व्यक्त केले.
तर ही सहल पेरीविंकल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक कार्यक्रम नव्हता तर तो अनुभव, प्रेरणा आणि भविष्याचा मार्ग दाखविणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
विद्यार्थ्यांनी केवळ विमानचालन उद्योग पाहिला नाही,
तर मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत आणि आत्मविश्वासाने भविष्याकडे पाऊल टाकण्याची प्रेरणा घेऊन परतले असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र बांदल सर यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक सायली गायकवाड, शिरीन काझी यांच्या सहकार्याने व वर्गशिक्षक ऋचा हल्लूर व ज्युनियर कॉलेज चे सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने ही शैक्षणिक सहल खरोखरच एक आगळा वेगळा अनुभव देऊन गेली.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले