March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन.

बालेवाडी :

पुण्यनगरीच्या अध्यात्मिक परंपरेला नवा तेजोमय आयाम देणारा ‘द्वादश मल्हार दर्शन’ हा अभूतपूर्व सोहळा येत्या रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बालेवाडी हायस्ट्रीट मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे आयोजित या अद्वितीय अध्यात्मिक पर्वात भारतातील बारा प्रमुख मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पवित्र पादुका प्रथमच पुण्यात एकत्र येणार असल्याने भक्तांमध्ये उत्सुकता आहे.

खंडोबाला कुलदैवत मानणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा प्रसंग म्हणजे “न भूतो, न भविष्यति” असा दिव्य आणि हृदयस्पर्शी अध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. श्री क्षेत्र जेजुरी (पुणे), श्री क्षेत्र खंडोबा पाल (सातारा), श्री क्षेत्र मार्तंड देव मंगळसुळी (बेळगाव), श्री मलातेश स्वामी देवस्थान देवरगुड्डा (कर्नाटक), श्री मैलारा लिंगेश्वर स्वामी (मैलार, कर्नाटक), श्री मैलारपुर स्वामी (मैलारपूर, कर्नाटक), श्री क्षेत्र खंडोबा (मालेगाव, नांदेड), श्री क्षेत्र खंडोबा (अणदूर, धाराशिव), श्री क्षेत्र खंडोबा (सातारा, छत्रपती संभाजीनगर), श्री क्षेत्र खंडोबा (शेगूड, अहिल्यानगर) आणि श्री क्षेत्र खंडोबा (निमगाव खेड) या पवित्र देवस्थानांतील खंडोबांच्या पगडी, घोडा आणि पादुका पुण्यात प्रथमच एकत्र आणल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व प्रमुख मार्तंड-मल्हार देवस्थानांचे दर्शन पुणेकरांना एकाच ठिकाणी लाभणार आहे, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. दिवसभर दर्शन सुरू राहणार असून, भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे. भक्ती, सेवा आणि समरसतेचा भाव जपत पुण्यनगरी एक वेगळाच अध्यात्मिक रंग अनुभवणार आहे.हा सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, बालेवाडी हायस्ट्रीट मैदान, बालेवाडी, पुणे येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पार पडणार असून, महाप्रसादही सकाळी १० ते रात्री १० या वेळेतच आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे प्रमुख संयोजक लहू गजानन बालवडकर यांनी या निमित्ताने पुणे शहर जिल्हा सह…बाणेर,बालेवाडी,पाषाण,सुतारवाडी,सोमेश्वरवाडी,सुस,महाळुंगे परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे की, आपल्या कुटुंबासह या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि खंडोबाच्या अभूतपूर्व दर्शनाचा लाभ घ्या.खंडोबाभक्त, वारकरी समाज आणि अध्यात्मप्रेमी नागरिकांसाठी हा सोहळा पुण्यनगरीच्या इतिहासात नोंदला जाणारा एक अविस्मरणीय अध्यात्मिक पर्व ठरेल, असा विश्वास लहू बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.