बाणेर :
पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि प्रशिक्षणामुळे एका नागरिकाचा जीव वाचल्याची घटना बाणेर परिसरात घडली.
पोलीस मुख्यालय, पुणे शहर येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 9980 सुशांत काशिनाथ रणवरे हे आज आपल्या बाणेर गावाकडे जात असताना अलोमा कंट्री सोसायटी समोर अचानक एक व्यक्ती जीप कंपनीच्या चारचाकी वाहनात (क्रमांक TS 08 HH 5544) गाडी चालवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध पडले.
घटनेची जाणीव होताच रणवरे यांनी प्रसंगावधान राखत त्वरित गाडी थांबवली. नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी वाहनाची मागील काच फोडून त्या व्यक्तीला बाहेर काढले. त्या वेळी त्या व्यक्तीच्या तोंडातून फेस येत होता. पोलिस प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या सीपीआर (छातीवरील दाब आणि तोंडाने श्वास देण्याची प्रक्रिया) तंत्राचा वापर करून रणवरे यांनी प्राथमिक उपचार दिले.
यानंतर त्यांनी कोणतीही विलंब न करता त्या व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या गाडीने ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे दाखल केले. डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमधील बेड क्रमांक 3 वर त्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू केले आणि वेळेवर दाखल केल्यामुळे त्यांचा प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर कॉन्स्टेबल रणवरे यांनी रुग्णाच्या पत्नीला संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी गाडीची चावी, पाकीट, आयफोन मोबाईल आणि दोन सोन्याच्या अंगठ्या सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिल्या.
या प्रसंगामुळे पोलिसांच्या सेवेतील तत्परता आणि मानवतेचे उदाहरण पुन्हा एकदा दिसून आले आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांनी आणि हॉस्पिटल प्रशासनाने पुणे शहर पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून कॉन्स्टेबल सुशांत रणवरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!