February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस येथे “BBSM Little Champions – Under 14 Cricket Tournament” ला उत्साहपूर्ण प्रारंभ भविष्यातील क्रिकेट चॅम्पियन्स घडवण्याचा उपक्रम — समीर चांदेरे

सूस :

लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, त्यांच्या हातातील बॅटचा जोश आणि डोळ्यांतली स्वप्नं… “BBSM Little Champions – Under 14 Cricket Tournament” च्या उद्घाटनावेळी आज हे सर्व दृश्य खरोखरच प्रेरणादायी ठरले. बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे परिसरातील बाल क्रिकेटपटूंसाठी आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ सूस येथील फिट अँड फोकस टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात झाला.

ही स्पर्धा पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री. गंगाधर भागवत व निवृत्त न्यायाधीश श्री. प्रकाश चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.

या स्पर्धेत तब्बल ४५ संघ आणि ६७५ पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले असून, परिसरातील क्रिकेटप्रेमी मुलांना आपली प्रतिभा सादर करण्याची ही उत्कृष्ट संधी मिळाली आहे.

“खेळातून संघभावना, शिस्त आणि जिद्द ही मूल्यं रुजवणं, तसेच नवोदितांना त्यांच्या क्षमतेचं दर्शन घडवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं — हा या उपक्रमामागचा माझा खरा हेतू आहे,” असं आयोजक समीर चांदेरे यांनी उद्घाटनावेळी सांगितलं.

त्यांनी पुढे म्हटलं, “या छोट्या चॅम्पियन्सनी दाखवलेला उत्साह, पालकांचे सहकार्य आणि आयोजक टीमची मेहनत पाहता हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल. या मैदानावरूनच उद्याचे तेंडुलकर, धोनी आणि कोहली तयार होतील — हीच खरी आशा आणि अभिमान आहे.”

कार्यक्रमाला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, सरला बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता कळमकर, परिसरातील मान्यवर, पालक, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धा पुढील काही दिवसांमध्ये रंगणार असून, प्रत्येक सामन्यातून नवोदितांना शिकण्याची आणि घडण्याची नवी संधी मिळणार आहे.