February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी, पाषाण आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप सोहळा संपन्न.. सामाजिक उपक्रम केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसावे, त्यात सातत्य असावे : बाबुराव चांदेरे

बाणेर :

“सामाजिक उपक्रम केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवू नयेत, तर त्यात सातत्य असलं पाहिजे,” असे मत पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे मा. अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले. बाणेर येथील धनकुडे फार्म येथे बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी, पाषाण आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या माध्यमातून  ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर आयोजित दिवाळी सरंजाम वाटप सोहळा गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बाबुराव चांदेरे बोलत होते.

“सन २००६ पासून सुरू झालेला हा उपक्रम आजतागायत सातत्यपूर्ण पध्दतीने अखंडपणे सुरू आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण आपण जनतेशी जपलेला विश्वास अबाधित राहिला पाहिजे. काहीजण निवडणुकीच्या आधी उपक्रम राबवतात, पण नंतर थांबवतात. मात्र, गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी हे उपक्रम सातत्याने चालू राहिले पाहिजेत,” असे मत चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केले.

दिवाळी सरंजाम वाटप सोहळा या उपक्रमाची सुरुवात सन २००६ मध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्या वेळी प्रभागातील २,५०० कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले होते. दरवर्षी वाढत गेलेल्या या उपक्रमातून आज जवळपास २० हजार कुटुंबांपर्यंत दिवाळीचा हा आनंद पोहोचला असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी व्यक्त केले. “बाबुराव चांदेरे यांनी लावलेलं हे छोटं रोपटं आज मोठ्या वटवृक्षासारखं बहरलं आहे, आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे हे ते यावेळी म्हणाले.

या सोहळ्यावेळी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार विजय भांबळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, अंकुशराव बालवडकर, गुलाबराव तापकीर, साहेबराव कळमकर, आत्माराम कळमकर, युवराज कोळेकर, सरला चांदेरे, गीता गुजर, ज्योती बालवडकर तसेच बाणेर, बालेवाडी, सुस,महाळुंगे, सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी या परिसरातील माजी सरपंच ,उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राणा तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटोळे यांनी केले.

“यंदाचा दिवाळी सरंजाम वाटप सोहळा हा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. दिवाळीचा गोडवा हा प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेल्या अनेक दशकांपासून निर्माण झालेलं हे कौटुंबिक नातं अधिकाधिक वृध्दिंगत व्हावे हीच सदिच्छा”

बाबुराव चांदेरे

(मा. अध्यक्ष- स्थायी समिती, पुणे महानगरपालिका)
======================