November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील राधा चौक ते ननावरे ब्रिज मार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी NHAI कडून तातडीने कामास सुरुवात

बाणेर :

राधा चौक ते ननावरे ब्रिज या महत्त्वाच्या मार्गावरील पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेऊन, भारत सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वतीने तातडीची पावले उचलण्यात आली आहेत.

NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार, पाऊस थांबताच खड्डे भरण्याचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीच्या सोयीला प्राधान्य देत सेवा रस्त्याचे दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच काँक्रीट रस्त्याच्या बांधकामालाही गती मिळाली आहे.

या कामाची पाहणी करण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ सरचिटणीस सचिन दळवी आणि अस्मिता करंदीकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला.

या वेळी सचिन दळवी म्हणाले, “आमचे मार्गदर्शक चंद्रकांत पाटील यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या वेळी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सर्विस रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तत्काळ पावले उचलली आहेत.”

NHAI आणि त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत, कारण त्यांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे आणि समन्वयामुळे या मार्गावरील कामे जलद गतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांचा दर्जा आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.