February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमधील वाहतूक कोंडीवर मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या माध्यमातून निघणार तोडगा..

– *रस्ता रुंदीकरणाला मिळणार गती*

– *जागा मालकांना योग्य मोबदला देऊन ताबा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा*

बाणेर :

बाणेर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हॉटेल पॅन कार्ड क्लब व धनकुडे वस्ती परिसराकडे जाणाऱ्या मुख्य चौकात नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, अरुंद रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांसह हजारो रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.नागरिकांच्या मागणीनुसार पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी संबंधीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज, शुक्रवारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच मा. खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या सोबत या ठिकाणी पाहणी केली. प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतल्यानंतर येथील समस्येवर ठोस निर्णय घेण्याची दिशा निश्‍चित करण्यात आली.

या पाहणीनंतर प्रशासनाने स्पष्ट केले की, या चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रस्तावित रस्त्यामध्ये येणाऱ्या जागांबाबत मूळ जागा मालकांशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांना न्याय्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विकासकामे करताना नागरिकांचे हित, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया या तत्त्वांचे पालन करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेनंतर हा रस्ता थेट मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दररोजच्या कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

या पाहणीदरम्यान सोसायट्यांमधील रहिवाशांसह पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त (घनकचरा) संदीप कदम, उपायुक्त (परिमंडळ २) संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अधिक्षक अभियंता (पाणी पुरवठा) प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जयवंत पवार, अधिक्षक अभियंता (पथ विभाग) अभिजित आंबेकर, प्रकाश पवार, रमेश वाघमारे, दिलीप काळे,योगिता भांबरे, शिवानंद पाटील, प्रल्हाद पवार इत्यादी अधिकारी उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“बाणेरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागात पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. रस्ते रुंद आणि सुरक्षित असतील तरच विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. नागरिकांच्या मागणीनंतर सुरू झालेली ही प्रक्रिया केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर परिसराच्या विकासाला नवा वेग देणार आहे. तसेच रस्त्यामध्ये येणाऱ्या जागांबाबत मूळ जागा मालकांशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांना पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य न्याय्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विविध सोसायट्यांमधील नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाची तत्परता यामुळेच हे स्वप्न वास्तवात उतरणार आहे. बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासातील हा टप्पा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.”

– बाबुराव चांदेरे,

मा. स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिका