February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर परिसरात अ‍ॅमेनिटी स्पेस जागेत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” उभारणीची मागणी

पुणे :

पुणे शहरातील बाणेर परिसरातील कुंदन गार्डन जवळील आंबेडकर नगर येथे सर्व्हे नं. ३/११/३ ही सुमारे १८ ते १९ गुंठे क्षेत्रफळाची जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार ही जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून घोषित करण्यात आली आहे. सदर जागेवर समाजहित व लोककल्याण यांचा विचार करून “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” उभारण्यात यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे साहेब यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी जंगल रणवरे, विश्वास रणवरे, प्रल्हाद निकाळजे, राजू रणवरे, सुभाष रणवरे, संतोष लोंढे, सतीश रणवरे, अमर रणवरे,अमोल शेलार, गणेश गायकवाड आणि स्वप्नील रणवरे सोबत उपस्थित होते.

या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीमुळे स्थानिक नागरिकांसाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे केंद्र उपलब्ध होईल. समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन विचारमंथन करण्यासाठी हे भवन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, संवर्धन व अभ्यासासाठी ही वास्तू एक प्रेरणादायी व केंद्रस्थानी भूमिका बजावेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार नसून ते समाजातील वंचित आणि शोषितांचे तारणहार आहेत. त्यांचे विचार व कार्य हे केवळ देशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत. तरुण पिढीला मार्गदर्शनाचे व अध्ययनाचे व्यासपीठ मिळावे, समाजातील सर्व घटकांना सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी एक मंच मिळावा या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडे या जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब यांनी केली. समाजहिताचे, लोककल्याणाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संवर्धन करणारे असे सांस्कृतिक भवन बाणेर परिसरात उभारले जाणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.