बाणेर :
बाणेर येथील पूनम विशाल विधाते यांच्या वतीने ‘वामा वुमेन्स क्लब’ने आयोजित केलेला गणपती मेकिंग आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात मुलांनी स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या, ज्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती आणि कलात्मकता दिसून आली.
या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी मातीपासून आकर्षक आणि सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला आणि त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण संदेशही दिला. मुलांनी केवळ मूर्ती बनवण्यापुरता सहभाग न घेता, विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांचा आत्मविश्वास आणि कला पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. हा उपक्रम मुलांसाठी एक आनंददायी आणि आत्मविश्वास वाढवणारा अनुभव ठरला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांसाठी खास मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुलांच्या आरोग्याची तपासणी करून पालकांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले. या आरोग्य शिबिरासाठी अंकुरा हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद जंबगी आणि नाडी तपासणीसाठी डॉ. तेजस्विनी भाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती मिळाली.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांचे प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे पूनम विशाल विधाते यांनी सांगितले. या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, पालक आणि सहभागी मुलांचे त्यांनी आभार मानले. अशा उपक्रमांमधूनच पुढील पिढीला सर्जनशीलता, कला आणि आरोग्य या मूल्यांची शिकवण मिळते, असेही त्यांनी नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी