पाषाण :–
पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण आणि माजी नगरसेविका सुषमा प्रमोद निम्हण यांच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यात संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्यांचे उद्घाटन तसेच पाषाण वैकुंठ स्मशानभूमीतील अत्याधुनिक APC प्रणाली आणि गॅस दाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.
श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात अनेक विकासकामे सुरू झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेऊन नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा आहे. पाषाण परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या टाळण्यासाठी दोन मोठ्या टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. आमच्या भगिनी-मायमाऊलींना टँकरसाठी दगदग करावी लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे.”
मुलांच्या शिक्षणासाठी नव्या शाळा इमारतीचे महत्त्व अधोरेखित करताना पवार म्हणाले, “ज्ञान संपादन केल्यास व्यक्तिमत्त्व उंचावते. संत तुकाराम विद्यालयाची नवीन इमारत या भागातील मुलांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करेल.”
पर्यावरणपूरक विकासावर भर देत उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “राम नदीचे पुनर्जीवन, अतिक्रमण निर्मूलन आणि परिसराचा नैसर्गिक वारसा जपणे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी सुविधा यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”
या सर्व कामांमुळे पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसर अधिक सुजलाम-सुफलाम व सुसंस्कृत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी सौ. सुषमा निम्हण आणि श्री. प्रमोद निम्हण यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कौतुक केले.
यावेळी आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, आमदार बापू पठारे, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, पीडीसीसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर, पूनम विशाल विधाते, युवा नेते सूर्यकांत भुंडे, दिपक दगडे आणि राजकीय सामाजिक, सांप्रदायिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी