September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी समीर चांदेरेंचे अजितदादांकडे निवेदन

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त, दुपदरी पूल व अंडरपासची मागणी,

-उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनाचा अभ्यास करून उपाययोजना करण्याचे दिले आश्वासन

बाणेर :

बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे या भागातील नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सदानंद हॉटेलजवळील राधा चौक आणि NH4 महामार्गाखालील पुलाजवळ दररोज मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम निर्माण होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे यांनी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आज सविस्तर निवेदन सादर केले.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांची रोजच्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कंबर कसली आहे. यासाठी धडाकेबाज निर्णय घेत पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे काम अजितदादा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर समीर चांदेरे यांनी आज अजितदादा पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हाळुंगे गावातून बाणेरकडे जाणाऱ्या 36 मीटर रुंदीच्या रस्त्यावर दुपदरी पूल उभारण्याची, तसेच बालेवाडी गावातील 24 मीटर रुंदीच्या रस्त्यावर अंडरपास पूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय म्हाळुंगे गावातून येणाऱ्या 30 मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावर आणखी एक अंडरपास पूल उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या तीनही सुविधा निर्माण झाल्यास वाकडपासून सुसखिंडीपर्यंत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळेल, असे समीर बाबुराव चांदेरे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे निवेदन स्विकारल्यानंतर समस्येचा सखोल अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दादांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत या मागण्यांचा अभ्यास करून व्यवहार्य मार्ग शोधून काढण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“बाणेर-बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीची समस्या ही दीर्घकाळापासूनची आहे. या समस्येवर दादांसमोर ठोस उपाययोजना मांडल्यानंतर त्यांनी तत्परतेने दखल घेतली आणि सखोल अभ्यास करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यासाठी मी दादांचा मनःपूर्वक आभारी आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी झाली तर हजारो नागरिकांचा प्रवास सुलभ होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनाला दिलासा मिळेल,” असे चांदेरे यांनी सांगितले.
समीर बाबुराव चांदेरे
(अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर)

 

You may have missed