March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस शाखेच्या पेरीविंकल स्कूलमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेवर आधारित जल्लोषात साजरा!!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेमध्ये शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ऑपरेशन सिंदूर हा विषय घेऊन जल्लोषात साजरा करण्यात आला. पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या उपस्थितीमध्ये कदम तालावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर झेंडा पूजन करून पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यावेळेस मान्यवर प्रमुख अतिथी श्री विक्रम सिंह मगर – प्रसिद्ध आणि प्रेरक वक्ते, श्री प्रशांत मोरे – प्रोवेडा प्रायव्हेट लिमिटेड व उद्योगपती श्री संदीप ढमढेरे यांच्यासमवेत शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत व झेंडा गीत इयत्ता सातवी ,आठवी ,नववीच्या विद्यार्थ्यांनी तबलाच्या तालावर सुरेख सादर केले. त्यानंतर प्रमुख अतिथींना तिरंगा पगडी व शेला आणि ग्रीटिंग कार्ड भेट देऊन स्वागत करण्यात आले .

स्वातंत्र्य दिनाची माहिती श्रद्धा पच्चीगर यांनी दिली त्यानंतर इयत्ता सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ” ए वतन ए वतन हमको तेरी कसम” आणि “तू मेरा कर्मा ” हे गीत सादर केले . श्री पवन करडे यांनी या गीताचे मार्गदर्शन केले. इयत्ता सातवी आठवी नववी दहावी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत या भाषेतून तडफदार भाषण केले .
तसेच विद्यार्थ्यांनी आत्ताच पहलगाम येथे झालेल्या टेररिस्ट अटॅक व त्यावर भारताने केलेले ऑपरेशन सिन्दुर यामध्ये घडलेले प्रसंग दाखवण्यात आले . मन हेलावून जाऊन रोमांच उभे राहतील असे सादरीकरण यातून दाखवून देऊन भारतावर जर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्मास्त्र देखील तयार करून शत्रूला नेस्तनाबूत करण्याची ताकद भारतात आहे हे ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेतून त्यांच्या कलात्मक नृत्यातून सर्वांसमोर मांडली. या नृत्याचे मार्गदर्शन श्री शिवप्रसाद पुजारी यांनी केले होते. काल शिक्षक श्री शिवराज कदम सरांनी सिंदूर ऑपरेशनचा देखावा अतिशय अप्रतिम आणि उत्कृष्ट रीतीने सादर केला होता.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी विकसित भारताविषयी कल्पना मांडून आजची थीम नया भारत याविषयी सांगून देशाविषयी असणारी भक्ती, देशनिष्ठा व्यक्त केली.

डायरेक्टर शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक केले .आणि विकसित भारतासाठी तसेच भारताचे संरक्षण करण्यासाठी भावी विद्यार्थ्यांना तयार होण्यासाठी सज्ज केले .

आजचे मान्यवर प्रदीप मोरे यांनी कुठलेही क्षेत्र निवडा पण प्रामाणिक पणे काम केल्यास आपण खरोखर स्वतंत्र असल्याचा तोच खरा पुरावा असतो असे सांगून सर्वांना प्रोत्साहन दिले.

आजचे प्रमुख अतिथी विक्रमसिंह मगर सर यांनी स्वातंत्र्य पूर्व इतिहास सांगून आज आपण स्वतंत्र असलो तरी एक सुजाण नागरिक म्हणून जगता आले पाहिजे. आजची पिढी हा उद्याचा विकसीत भारत आहे हे सर्वांनी स्मरणात ठेऊन जबाबदारीने वागून कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता एक स्वच्छ नागरिक म्हणून मेरा भारत महान बनवला पाहिजे असे प्रखर विचार त्यांच्या भाषणातून मांडले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते. पर्यवेक्षक सचिन खोडके स्मिता श्रीवास्तव ,नेहा माळवदे यांच्या सहकार्याने व क्रीडा शिक्षक द्यानेश्वर मोरे आणि शैला परुळेकर यांच्या व सर्व शिक्षक गण व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात हा स्वातंत्र्य दिन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ प्रफुलता पाटील आणि श्रद्धा पच्चीगर यांनी केले.