May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथे सचिन मानवतकर मित्र परिवार तर्फे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन – हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

औंध :

आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सचिन मानवतकर मित्र परिवार तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

नेतृत्वाच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली

या शिबिरात शिवाजीनगर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, औंध गाव विश्वस्त मंडळ, तसेच स्थानीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमातून आरोग्य जाणीव वाढवण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांना वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता.

४५०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

या शिबिरात सुमारे ४५०० नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. गरजेनुसार रुग्णांना व्हीलचेअर, कंबरेचा पट्टा, मानेचा पट्टा, गरम पाण्याच्या पिशव्या, चष्मे आणि अन्य आरोग्यविषयक उपकरणे मोफत प्रदान करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम सचिन मानवतकर यांच्या पुढाकाराने आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून राबवण्यात आला.

नेत्यांचे विशेष कौतुक आणि शुभेच्छा

या कार्यक्रमात बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सचिन मानवतकर यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “सचिन यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे. समाजसेवेच्या भावनेतून अशा उपक्रमांची गरज आहे.”

आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी देखील सचिन मानवतकर यांच्या कार्याची दखल घेत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सचिन गेल्या ४-५ वर्षांपासून सतत सामाजिक कार्य करत आहेत. आरोग्य सेवांप्रती त्यांची तळमळ स्पष्ट दिसते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी औंधमध्ये स्वखर्चाने मोफत दवाखाना सुरू केला आहे आणि तो आजही उत्कृष्ट रीतीने सुरू आहे. सचिन यांनी आज आयोजित केलेले हे भव्य आरोग्य शिबिर त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट नमुना आहे.”

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचे महत्त्व

शिबिराच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. सचिन मानवतकर यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाला औंधमध्ये एक सक्षम नेतृत्व आणि निःस्वार्थी कार्यकर्ता मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

या भव्य आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. सचिन मानवतकर आणि सौ. निशा मानवतकर यांनी सर्व भाजपा पदाधिकारी, औंध गाव विश्वस्त, मित्र परिवार आणि सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानले.