May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत !! – ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला केले जागे -डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरिया प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी

कोथरूड :

पुणे शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळे ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर सोमवारी चक्क महापालिकेत धुरीकरण मशीन घेऊन आले. महापालिका परिसरात धुरीकरण करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा संतापजनक भावना अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

कोथरूड परिसरात डेंगू, मलेरिया, झिका,चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. याबाबत पालिकेकडून योग्य उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे सोमवार ( दि.9) महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे यांची अमोल बालवडकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी रुग्णांना आरोग्य सेवेमध्ये होत असलेल्या गैरसोयीबाबत चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी महापालिका परिसरात धुरीकरण करून पालिकेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध देखील केला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेतली जाते . मात्र त्यानंतर या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे सोसायटी, बैठी घरे, गृहसंकुल यामध्ये या रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तपासणी मोहीम करणे,नागरिकांना नोटिसा बजावणे. एवढेच सोपस्कार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात. मात्र त्यानंतर या नागरिकांना आरोग्य उपचार वेळेत मिळतात का ? याबद्दल कोणतीही उपाययोजना महापालिकेकडे नाही. कोथरूड, पाषाण,बाणेर या परिसरामध्ये घरटी एक रुग्ण आढळून येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्येष्ठ रुग्ण, लहान मुले यांना हे आजार झाल्यामुळे कुटुंबांना दवाखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र वेळेत उपचार मिळत नाही. कोथरूड परिसरात पालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे येथे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात, ज्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. याबाबत वारंवार प्रशासनाला सांगून देखील बांधून पूर्ण असलेले पालिकेचे रुग्णालय अद्यापही सुरू करता आलेले नाही. प्रशासनाला ही विदारक परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी आज फॉगिंग मशीन घेऊन पालिका परिसराचे धुरीकरण केले. जेणेकरून नागरिकांच्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत पोहोचतील असे अमोल बालवडकर म्हणाले यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य तसेच कोथरूड परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोथरूड परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात डेंगू, मलेरिया ,झीका, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण उपचार मिळत नसल्यामुळे तक्रारी करतात. यासाठी स्वखर्चाने गेल्या पंधरा दिवसापासून कोथरूड परिसरातील अनेक सोसायटी,बैठी घरे, व्यावसायिक आस्थापना यांच्या परिसरात धुरीकरण सुरू केले आहे. दिवसभरात अनेकांचे कॉल या धुरीकरणासाठी येतात. रुग्णांची संख्या, त्यांना मिळत नसलेले उपचार त्यामुळे होणारी नागरिकांची फरपट प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे – अमोल बालवडकर (मा. नगरसेवक/भाजपा कार्यकर्ता/अध्यक्ष,अमोल बालवडकर फाउंडेशन, कोथरूड)