पुणे :
नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात पोलिसांकडून बंदी घालूनही लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्या, तसेच डीजेचा कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या तरुण मंडळांवर कडक कारवाई करावी. त्याचप्रमाणे मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या या घटकांवर पुणे शहरात कायम स्वरूपी बंदी आणावी असे निवेदन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी काल सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच शहरात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा अमर्याद वापर करण्यात आला. या उत्सवापूर्वी पोलिसांनी तरुण मंडळांच्या बैठकीत उत्सवी ध्वनी प्रदूषण टाळण्याचे तसेच लेझर लाईट वापर न करण्याचे आवाहन करून पुढील ६० दिवस शहरात लेझर दिवे वापरण्यास बंदी घातली होती.
डीजेमुळे काहींना कायमचे बहिरेपण आले आहे तर काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेली आहे. मागील वर्षीच्या गणेश उत्सवानंतर डीजे आणि लेझरच्या दुष्परिणामा संदर्भातील बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. हल्ली सण उत्सव व महापुरुषांच्या जयंतीमध्ये इलेक्ट्रॉनिक व तांत्रिक गोष्टी वापरून गोंगाट निर्माण करण्याची फॅशन झाली आहे. स्वार्थासाठी काही लोक याला प्रोत्साहन देत आहेत. यातून आपली परंपरा संस्कृतीचे भान सर्व समाजाला नसल्याचे चित्र दिसत आहे. गरोदर महिला, परीक्षार्थी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांना याचा त्रास होतो. दुर्देवाने जिल्ह्यातले सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या ‘ससून’च्या बाहेर ही जोरजोरात डीजे लावला जातो. साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी, त्याची आवाज मर्यादा किती असावी याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या गाईड-लाईनचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांनाही याचा त्रास सहन करवा लागतो. अनेक पोलिसांना उत्सवानंतर रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागतात. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. लेझरच्या अतिनील किरणांमुळे अनेकांना अंधत्व आले आहे. लोहगाव विमानतळाजवळ ही मिरवणुकीत लेझरचा वापर होत असल्याने, याचा वैमानिकांना त्रास होऊन एखादा विमान अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात डीजे आणि लेझर लाईट विरुद्ध तक्रारी घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकांना होणारा त्रास आणि मानवी आरोग्यावर होणारे याचे दुष्परिणाम पाहता पुणे शहरात आपण यावर कायम स्वरूपी बंदी घालावी. तसेच बंदीचे उल्लंघन करून दहीहंडी उत्सवात लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करावी. अशी विंनती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..