September 17, 2024

Samrajya Ladha

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला

नवी दिल्ली/पुणे :

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनीही आज पदभार स्विकारला. यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी, तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.
…………….

पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारमधले हे महत्त्वाचे खाते आहे. या क्षेत्रात आव्हानं खूप असली तरी गेल्या दहा वर्षात या विभागात खूप मोठे काम झाले आहे. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. मला आठवते आहे, पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो. मात्र, त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण समोरच्या खुर्चीवर कधीकाळी बसू. भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे.

‘पुढच्या १० वर्षातं सगळे बदललेले असेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरु करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करुन गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.’ : मुरलीधर मोहोळ (केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री)