October 1, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनची ५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनची ५वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत फेडरेशनच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेण्याबरोबरच विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

फेडरेशनचे सचिव आशिष कोटमकर यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सभेसमोर सादर केले. अध्यक्ष रमेश रोकडे यांनी फेडरेशनचा पाचवा वार्षिक अहवाल मांडत २०२५-२६ या वर्षात फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. खजिनदार दफेदार सिंह यांनी आर्थिक विवरणपत्रे तसेच अंदाजपत्रक सभेसमोर सादर केले. त्यास उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.

फेडरेशनला नुकतेच आयकर विभागाकडून ८० जी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी फेडरेशनचे सदस्य संदिप मंडोलिया यांनी विनामोबदला सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल सभेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी फेडरेशनच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांच्या कामाचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धन व नदी वाचविण्यासाठी कार्य करणाऱ्या वंदना चौधरी, ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या ॲड. रुपाली रायकर, ‘पाणी वाचवा’ अभियान राबविणाऱ्या शुभांगी चपाटे, पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास करणारे यश चौधरी तसेच फेडरेशनचा आयटी सेल सांभाळणारे योगेश डुंबरे यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

दरम्यान, बाणेर-बालेवाडी परिसरातील मूलभूत नागरी समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० हजार नागरिकांच्या सह्यांची पत्रे पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सह्यांच्या पत्रांचे मोठे गठ्ठे हातात घेत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून परिसरातील पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता यांसह विविध मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. ही सह्यांची पत्रे स्थानिक आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फेडरेशनच्या विविध उपक्रमांमध्ये अधिकाधिक सभासदांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.