August 15, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“सिद्धिविनायका आता तरी पावशील का?”; औंधच्या अस्वच्छतेवर नगरसेवक सनी निम्हण आक्रमक

औंध :

औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचरा आणि अस्वच्छतेच्या समस्येबाबत वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला औंध परिसरातील अस्वच्छतेचे चित्र समोर आणत त्यांनी, “कचऱ्यापासून स्वातंत्र्य कधी मिळणार?” असा सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.

 

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचऱ्याची समस्या तसेच सफाई कामगार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित अनास्थेबाबत आपण आवाज उठविला होता, असे निम्हण यांनी सांगितले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने ‘सिद्धिविनायक’ संस्थेला सफाईचे काम देण्याचा निर्णय घेतला. १ ऑगस्टपासून तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू करण्यात आले. मात्र, काम सुरू होऊन काही दिवसांतच परिसरातील अस्वच्छतेचे चित्र पुन्हा समोर आल्याने त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“एखादी संस्था मोठी जबाबदारी स्वीकारताना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काम करत असेल, तर त्या काळात ती संस्था सर्वस्व पणाला लावून कामाची चोख अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा असते. मात्र, येथे त्याच्या अगदी उलट चित्र दिसत आहे,” अशी टीका निम्हण यांनी केली.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असतानाही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “इतके मनुष्यबळ उपलब्ध असताना परिसरात कचरा आणि अस्वच्छता कायम राहणे ही गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले.

याबाबत पुणे महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “सांगूनही ऐकत नाहीत, काम वेळेवर होत नाही, आमच्याकडे अधिकार नाहीत, एक महिन्यानंतर दंडात्मक कारवाई करता येईल,” अशा स्वरूपाची उत्तरे पुन्हा ऐकायला मिळत असल्याचा दावा निम्हण यांनी केला.

“हीच परिस्थिती टाळण्यासाठी एका व्यावसायिक संस्थेची निवड करण्यात आली आहे. पुन्हा पूर्वीप्रमाणेच परिस्थिती निर्माण होणार असेल, तर नागरिकांचा पैसा आणि महापालिकेचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून पालिका आणि संबंधित संस्थेमध्ये योग्य समन्वय निर्माण करणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेकडून स्वच्छतेचे काम अपेक्षित पद्धतीने केले जाईल, याबाबत लेखी ग्वाही घेण्यात यावी आणि कामात हलगर्जीपणा झाल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट अधिकार महापालिकेकडे असावेत, अशी मागणी निम्हण यांनी केली.

“ही परिस्थिती आमच्या औंध-बोपोडी प्रभागाची आहे. इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसेल, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे हा केवळ एका परिसराचा प्रश्न न मानता महापालिकेने संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा,” असेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला औंध परिसरातील अस्वच्छतेचे चित्र पाहून नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, असे सांगत निम्हण यांनी सवाल केला—

“स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली; मात्र कचऱ्यापासून स्वातंत्र्य कधी मिळणार?”

— सनी विनायक निम्हण

नगरसेवक, पुणे महानगरपालिका