July 23, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवर सनी निम्हण यांचा सवाल “सफाई कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेची सफाई कधी होणार?”

स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित मॉनिटरिंग यंत्रणा उभारण्याची मागणी

औंध :

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सप्ताह’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांची विशेष बैठक औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती राहिल्याने नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सफाई व्यवस्थेतील अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे १२५ कायमस्वरूपी कर्मचारी, ४७२ कंत्राटी कामगार, ३०० स्वच्छ कर्मचारी तसेच एसआय, बीएसआय व इतर कर्मचारी मिळून जवळपास १००० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. मात्र स्वच्छता अभियानासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला केवळ २५० कर्मचारी उपस्थित राहिले.

“स्वच्छतेचे पुरस्कर्ते आणि महाराष्ट्राच्या जनमानसात आदराचे स्थान असलेल्या कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष अभियानाच्या बैठकीला एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी उपस्थिती असणे ही चिंताजनक बाब आहे. कर्मचाऱ्यांची आपल्या कर्तव्याप्रती असलेली ही अनास्था प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,” असे सनी निम्हण यांनी सांगितले.

खासगी क्षेत्रातील शिस्त महापालिका व्यवस्थेत का नाही?

आज खासगी क्षेत्रातील मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट कार्यालये येथे स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करताना दिसतात. वेळेचे नियोजन, कामाची गुणवत्ता आणि जबाबदारी यामध्ये त्यांची तत्परता दिसून येते.

“महापालिका कर्मचाऱ्यांना तुलनेने अधिक वेतन, शासकीय सुविधा आणि सेवासुरक्षा उपलब्ध आहे. असे असतानाही सार्वजनिक स्वच्छतेच्या कामात अपेक्षित परिणाम दिसत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत सनी निम्हण यांनी व्यक्त केली.

स्वच्छता व्यवस्थेसाठी डिजिटल मॉनिटरिंगची मागणी

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी सनी निम्हण यांनी केली आहे.

यामध्ये:

• थम्ब एंट्रीद्वारे उपस्थिती नोंद,
• जिओ मॅपिंग,
• जिओ टॅगिंग,
• रिअल टाइम वर्क रिपोर्टिंग,
• जीपीएस आधारित मॉनिटरिंग,
• एआय तंत्रज्ञानाचा वापर,
• मोबाईल ॲपद्वारे कामाचा आढावा,
• स्वतंत्र डिजिटल कमांड सेंटर

अशा उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, कामचुकारांवर कारवाई आवश्यक

“महापालिकेमध्ये अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यभावनेने काम करत आहेत. मात्र काही कर्मचाऱ्यांकडून कामाप्रती असलेली अनास्था संपूर्ण व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहे. प्रशासनाने काम करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि कामचुकारांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घ्यावी,” असे निम्हण म्हणाले.

नागरिकांच्या करातून उभ्या राहणाऱ्या व्यवस्थेत सार्वजनिक स्वच्छता ही प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे सफाई व्यवस्थेतील त्रुटी दूर करून प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली.

“प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन सुधारणा केल्या नाहीत, तर नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल,” असा इशाराही सनी निम्हण यांनी दिला.

 

You may have missed