March 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल सुस येथे Sr. KG चा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न!!!

सुस :

सुस: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस येथे Sr. KG च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याने लहानग्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला टप्पा अभिमानाने पूर्ण झाल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण केली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी संस्थेच्या संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल, शाळेच्या प्राचार्या निर्मल पंडित, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागप्रमुख नेहा माळवदे, पूर्व प्राथमिक शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृह आनंद, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणाने भारावून गेले होते.

या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांनी आकर्षक पदवी वेशभूषेत (graduation caps & gowns) मंचावर येत अत्यंत आत्मविश्वासाने प्रमाणपत्र स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, निरागसता आणि अभिमान पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. प्रत्येक विद्यार्थ्याचा हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक उपक्रम हे विशेष आकर्षण ठरले. रंगतदार नृत्य, गोड गीते, तसेच छोट्या लहानग्यांनी भाषण देऊन विद्यार्थ्यांनी आपली कला, आत्मविश्वास आणि स्टेज प्रेझेन्स प्रभावीपणे सादर केली.

संचालिका रेखा बांदल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षण केवळ पुस्तकी नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा कार्यक्रमांची मोठी भूमिका असते.” त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच संचालिका शिवानी बांदल यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी पालक व शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा मजबूत पाया घडतो, असे नमूद करत पालकांचे आभार मानले.

तसेच शाळेच्या प्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या या पहिल्या शैक्षणिक टप्प्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित करत, “मूलभूत शिक्षण भक्कम असेल तर पुढील प्रवास अधिक यशस्वी होतो,” असे मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी शाळेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सर्जनशील टोपी व आकर्षक गिफ्ट्स. या सर्वामागे प्री-प्रायमरी विभागातील शिक्षकांची कल्पकता, मेहनत व सूक्ष्म नियोजन स्पष्टपणे दिसून आले. संपूर्ण टीमने उत्कृष्ट समन्वय साधत हा सोहळा संस्मरणीय बनवला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेटक्या नेतृत्वाने विभागप्रमुख नेहा माळवदे यांच्या सहयोगाने व सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी यांच्या मदतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पदवीदान समारंभ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंशिका जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी उत्स्फूर्तपणे शाळेच्या प्राचार्या व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजन, सादरीकरण व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे प्रभावित होऊन *पालकांनी शाळेला “५ स्टार” रेटिंग देत आपले समाधान व्यक्त केले.*

या पदवीदान समारंभामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आनंदात व अभिमानाने पूर्ण झाला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना नवी ऊर्जा, आत्मविश्वास व प्रेरणा मिळाली आहे.