March 11, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी विमेन्स क्लबतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांतून नारी शक्तीचा गजर

बालेवाडी :

बालेवाडी विमेन्स क्लबतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर महिलांसाठी भव्य मनोरंजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रम, खेळ आणि आरोग्य शिबिरांमुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महिलांना दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांना स्वतःसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बालेवाडी विमेन्स क्लब वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. यामध्ये महिलांसाठी हेल्थ कॅम्प, क्रिकेट स्पर्धा तसेच इतर अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात विविध स्टॉल लावण्यात आले होते. निशुल्क दंतचिकित्सा, निशुल्क नेत्रतपासणी, जिम, सलून, बँक, एलआयसी, टॅरो कार्ड तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय महिलांसाठी अनेक मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

“सुनहरा बचपन” या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात महिलांनी आपले लहानपण पुन्हा अनुभवले. टिपरी पाणी, लगोरी, लिंबू-चमचा, गधे की पूंछ अशा विविध पारंपरिक खेळांमधून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रवेशद्वारावर महिलांचे स्वागत करताना पेपरमिंटच्या गोळ्या आणि बोरकूट देऊन नव्वदच्या दशकातील आठवणींना उजाळा देण्यात आला.

स्पर्धेत विजयी झालेल्या सौ. माधुरी यांनी सांगितले की, “इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर सुमारे २० वर्षांनी आज पुन्हा मेडल आणि सर्टिफिकेट मिळाल्याचा आनंद खूप खास वाटत आहे.”

या प्रसंगी क्लबच्या संचालिका प्रा. रुपाली ताई बालवडकर म्हणाल्या की, “नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभा राहणारा पुरुष जर घरातील आई, बहीण किंवा पत्नीला त्रास देत असेल, तर स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या देवीची संकल्पना त्याला समजलेली नाही. भारतीय परंपरेत स्त्रीशक्तीची महती म्हणूनच देव-देवतांची पूजा केली जाते. ज्या दिवशी हा विचार समाजात खोलवर रुजेल, त्या दिवशी नारी सशक्तीकरण आपोआप साध्य होईल.”

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या मीत, मानसी, प्राजक्ता, मोनिका, शिवांगी आणि फराह यांनी विशेष योगदान दिले.