बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन शाखेत आज शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागातील सीनियर केजी (मोठा गट) विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अविस्मरणीय असा “न भूतो न भविष्यती” अनुभव दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक विभागातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी पूर्व प्राथमिक विभागासाठी नृत्य सादर करून जणू आम्ही या चिमुकल्यांची जबाबदारी खांद्यावर घ्यायला सज्ज असून मैत्रीचा हात पुढे करून जणू सर्वांना ग्वाही दिली. सादर केलेल्या या आकर्षक नृत्याविष्काराने सभागृहातील वातावरण रंगतदार झाले आणि उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या सोहळ्याचा मुख्य आकर्षण म्हणजे पदवीप्रदान समारंभ. पदवीप्रदानाच्या विशेष पोशाखात सजलेली चिमुकली मुले मंचावर येऊन आपल्या सीनियर केजी पदवी प्रमाणपत्रांचा आनंदाने स्वीकार करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करून आता प्राथमिक विभागात प्रवेश करण्याच्या या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद पालकांनीही अनुभवला.
पालकांच्या प्रतिक्रिया सत्रात अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेतील उत्तम शिक्षण पद्धतीचे तसेच शिक्षकांच्या समर्पित कार्याचे मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा केवळ एक समारंभ नसून विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी केलेल्या मेहनतीचा सन्मान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने कार्यरत आहे आणि भविष्यातही पालकांचे असेच सहकार्य लाभावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच संचालिका शिवानी बांदल यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, ही मुले अत्यंत निरागस असून त्यांच्यातील गुणांना योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षक अत्यंत समर्पणाने करीत आहेत. त्यांनी सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया हा याच टप्प्यात घातला जातो. शाळा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे सांगून त्यांनी पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.
या शानदार सोहळ्याच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या दिमाखदार पदवीप्रदान समारंभाने विद्यार्थ्यांच्या पहिल्या शैक्षणिक प्रवासाची यशस्वी सांगता करून नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली आणि त्यांच्या स्वप्नांना नवे पंख दिले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शिरीन काझी, सायली गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रियांका रोज यांनी केले तर आभारप्रदर्शन पल्लवी रणसिंग यांनी केले.



More Stories
ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ
बालेवाडी विमेन्स क्लबतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांतून नारी शक्तीचा गजर
विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरची तपासणी सात दिवसांत, पीएमआरडीए आयुक्तांचे सनी निम्हण यांना आश्वासन..