March 17, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन व स्पोर्ट्स डे चा दुग्धशर्करा योग

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या सूस शाखेत ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्पोर्ट्स डे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पेरीविंकल क्रीडा संकुल च्या नवीन प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. त्यानंतर ध्वज पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माननीय उदय हर्डीकर – माजी अध्यक्ष, भारत विकास परिषद कोथरूड आणि संगणक प्रणाली मार्गदर्शक, संजीव कुलकर्णी – अध्यक्ष भारत विकास परिषद कोथरूड , शामकांत उकिडवे – संपर्क प्रमुख भारत विकास परिषद कोथरूड ( इंजिनीयर) तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवरांसमवेत शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक, palk आणि विद्यार्थीगण उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवर व सर्वांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून देशाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून सर्वांनी संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध मार्चपास्टने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांतून देशभक्तीचा जागर
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संस्कृत व इंग्रजी भाषणे, देशभक्तीपर गीते, नृत्य सादरीकरण तसेच ह्यूमन पिरॅमिड सादर करून प्रेक्षकांची मनापासून दाद मिळवली.
देशभक्तीपर गीतांमधून स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान, राष्ट्राची एकता व संविधानाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले. नृत्य व क्रीडाविषयक सादरीकरणातून शिस्त, संघभावना, परिश्रम व आत्मविश्वास या मूल्यांचे प्रभावी दर्शन घडले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी मोलाची प्रेरणा आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचे आचरण करण्याचा संदेश दिला.
राष्ट्रभक्ती, शिस्त व कर्तव्यभावना यांचे महत्त्व अधोरेखित करत जबाबदार नागरिक घडवणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे असे नमूद करून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करत सर्व कामात स्वतःपासूनच सुरवात करून जर एक पाऊल पुढे घेतले तर विकसित, बलाढ्य भारत महासत्ता बनायला फारसा वेळ लागणार नाही असे प्रतिपादन करत सर्वांचे मनापासून कौतुक करून यात पहिले पाऊल आपले आहे असे सांगितले.

प्रमुख पाहुणे माननीय श्री उदय हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने प्रगती करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि शिस्तबद्ध आखणी यासाठी मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचे मनापासून कौतुक करून आज जणू खरोखरच लाल किल्ल्यावर आहोत असा भास होत असल्याचे नमूद करत हा सर्व डोळे दिपवून टाकणारा देखावा बघून खूप धन्यता वाटली असे त्यांच्या भाषणात सांगितले.
श्री शिवराज कदम यांनी देशभक्तीची भावना जागृत करणारी लाल किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली होती.
यानंतर स्पोर्ट्स डेचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून शाळेचा ध्वज आणि सर्व खेळांचे साहित्यांचे पूजन करून करण्यात आले तर क्रीडांगणाचे उद्घाटन हे भूमिपूजनाने करण्यात आले. उद्घाटन सामना मोठ्या उत्साहात पार संपन्न झाला.

ओपनिंग मॅच खो-खो च्या स्पर्धेत इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सामन्यात ब्लू हाऊस विजयी झाले. हा क्षण उपस्थितांसाठी अतिशय संस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.
क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडास्पृह, जिद्द, संघभावना व शिस्त या गुणांचा विकास झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विजेत्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रेरणादायी संदेश
“संविधानाची मूल्ये आचरणात आणणे आणि क्रीडास्पृह जपणे हेच सशक्त राष्ट्रनिर्मितीचे खरे बळ आहे,” हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संस्थापिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल तसेच निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक श्री सचिन खोडके, सौ. स्मिता श्रीवास्तव व सौ. नेहा माळवदे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व इव्हेंट हेड सौ. योगिता धाने यांनी समर्थपणे केले. विद्यार्थ्यांच्या परेडसाठी आवश्यक मार्गदर्शन श्री ज्ञानेश्वर मोरे सर यांनी केले.

ब्ल्यू हाऊस टीमचे कॅप्टन श्री कृष्णा अंभोरे सर तसेच वाईस कॅप्टन सौ. आदिती कासार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम सृजनशीलतेने व यशस्वीपणे पार पाडला. सर्व शिक्षकवृंदांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

तसेच सर्व शिक्षकवृंदांच्या सहकार्यामुळे हा प्रजासत्ताक दिन व स्पोर्ट्स डेचा कार्यक्रम अत्यंत शिस्तप्रिय, प्रेरणादायी व यशस्वीरीत्या पार पडला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रफुल्ल पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना “देशभक्ती म्हणजे केवळ शब्द नाही, तर शिस्तबद्ध जीवन, प्रामाणिक कर्तव्यपालन आणि राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान देणे” हा मोलाचा संदेश देत आजचा विद्यार्थी हा उद्याचा राष्ट्रकर्ता असून, संविधानाच्या मूल्यांवर चालणारी पिढीच भारताला सशक्त, समर्थ व उज्ज्वल भविष्यात घेऊन जाईल, असा ठाम विश्वास या प्रजासत्ताक दिन व स्पोर्ट्स डेच्या माध्यमातून निर्माण झाला असे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी स्पष्ट केले.

 

 

You may have missed