March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अप्पा–भैय्याची जोडी मैदानात! सुसमध्ये पदयात्रेतून विकासाचा एल्गार

सुस येथे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

सूस :

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचाराचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सुस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज मोठ्या उत्साहात, जल्लोषाच्या वातावरणात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली.

भगवती नगर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. पारखे वस्ती, शिवबा चौक, बाल मित्र मंडळ, मुंजाबा चौक, वाढेश्वर मंदिर, पंचरत्न मंडळ असा मार्गक्रमण करत भैरवनाथ मंदिर येथे जाहीर सभेने पदयात्रेची सांगता करण्यात आली.

पदयात्रेच्या सुरुवातीपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. फुलांचा वर्षाव, जोरदार घोषणाबाजी आणि सभेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून झालेल्या विकासकामांचे कौतुक करत जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी बोलताना माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, “विकासाच्या दोन शक्ती एकत्र आल्या आहेत. अप्पा आणि भैय्या ही जोडी आता परिसराचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, डी.पी. आणि क्रीडांगण यांचा समावेश असलेला सर्वांगीण विकास आराखडा तयार केला जाईल. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, उर्वरित जबाबदारी आमची आहे.”

अमोल बालवडकर म्हणाले, “बाबुराव अप्पा आणि मी जनतेच्या कामाची माणसे आहोत. आमचा संघर्ष कामासाठी होता आणि आता आम्ही एकत्र आलो आहोत. बाणेर-बालेवाडीप्रमाणेच सुस-म्हाळुंगे गावचा विकास करू, हा शब्द भैरवनाथाच्या साक्षीने देतो. मायबाप जनता आमच्या सोबत असताना आम्हाला कोणीही हरवू शकत नाही.”

प्रचार प्रमुख व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, “दोन्ही महिला उमेदवार उच्चशिक्षित असून अप्पा आणि भैय्या यांच्यासह चौघांचे एक मजबूत विकासाचे समीकरण तयार झाले आहे. आज गावकी-भावकी एकत्र आली असून सोसायटी वर्गाचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. विरोधकांची भांबेरी उडवत, घड्याळचे पुढचे बटण दाबून या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे.”

या पदयात्रेत सुस गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सहउमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे, सौ. पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर उपस्थित होते.

या निमित्ताने येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले.