बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत चारही उमेदवारांनी युतिका सोसायटी येथे भेट देत नागरिकांशी थेट, मनमोकळा आणि सकारात्मक संवाद साधला. या प्रचार दौर्याला सोसायटीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या भेटीदरम्यान नागरिकांनी परिसराच्या नियोजनबद्ध विकासासंदर्भात आपल्या अपेक्षा, समस्या आणि सूचना स्पष्टपणे मांडल्या. पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक सोयीसुविधांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक मुद्द्याची उमेदवारांनी गांभीर्याने दखल घेतली. उपस्थित प्रश्नांवर योग्य मार्ग काढून विकासाभिमुख निर्णय घेण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या जनसंवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर उपस्थित होते. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत या चारही उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी सोसायटीतील नागरिकांना केले.
युतिका सोसायटीतील रहिवाशांनीही स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत सांगितले की, “नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारी भूमिका, वेळोवेळी केलेले ठोस प्रयत्न आणि कामातून दिसणारी विश्वासार्हता यामुळे आमचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे.” नागरिकांकडून व्यक्त झालेला हा विश्वास म्हणजे आजवर केलेल्या कामाची पावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नागरिकांकडून मिळालेला स्नेह, विश्वास आणि सकारात्मक प्रतिसाद निश्चितच अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असून, युतिका सोसायटीसह संपूर्ण परिसराच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी ही साथ मोलाची ठरणार असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन