सुतारवाडी :
सुतारवाडी–पाषाण परिसरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले महेश भिमराव सुतार व सौ. पूजा महेश सुतार या तरुण जोडप्याने प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) येथून राखीव महिला व सर्वसाधारण पुरुष गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महेश भिमराव सुतार यांनी वडील भिमराव फकिरा सुतार यांच्याकडून सामाजिक कार्याचे संस्कार घेत लहानपणापासून समाजकार्याची आवड जोपासली आहे. संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेतलेले महेश सुतार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. सर्वसाधारण पुरुष गटातून पक्षाकडे उमेदवारीची इच्छा असताना, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
महेश सुतार यांच्या मातोश्री सौ. सुनिता भिमराव सुतार चौधरी या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या असून, त्यांनी सुस, सुतारवाडी, पाषाण व सोमेश्वरवाडी परिसरातील महानगरपालिका शाळांमध्ये दीर्घकाळ शिक्षिका म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रेरणेतून महेश व पूजा सुतार यांनी ‘फकिरा फाउंडेशन’च्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर प्री-स्कूल चालवून शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान दिले आहे.
समाजसेवेचा हाच वसा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी या तरुण जोडप्याने प्रभाग क्रमांक ९ मधून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांच्या या निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन