February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

विज्ञानतज्ञ डॉ. सुलभा विधाते यांचे पेरीविंकलच्या सर्व शाखांमध्ये इयत्ता १० वी साठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज च्या इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी बावधन, सूस, पिरंगुट आणि पौड या सर्व शाखांमध्ये मध्ये विज्ञान विषयावर मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान संपन्न झाले, चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन , सूस, पिरंगुट आणि पौड येथे इयत्ता १०वीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाच्या प्रभावी तयारीसाठी एक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

या मार्गदर्शन सत्रासाठी डॉ. सुलभा विधाते (समन्वयक व सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने योग्य दिशा, अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आणि विज्ञान विषयात अधिक गुण मिळवण्यासाठी आवश्यक रणनीती समजावून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवतेच्या आशीर्वादाने, सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी प्रमुख वक्त्या डॉ. सुलभा विधाते यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी शाळेचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. सुलभा विधाते यांनी बोर्ड परीक्षांचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेची रचना आणि मूल्यांकन पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी न करता संकल्पना स्पष्टपणे समजून घेण्यावर भर द्यावा, असे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. विज्ञान विषयात आकृत्या, योग्य संज्ञा, मुद्देसूद मांडणी आणि सुस्पष्ट सादरीकरण यांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

डॉ. विधाते यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन व वेळेचे व्यवस्थापन, विज्ञान विषयासाठी स्मार्ट व परिणामकारक उजळणी तंत्र, अचूक, मुद्देसूद व सुव्यवस्थित उत्तरे लिहिण्याची पद्धत, बोर्ड परीक्षेत टाळावयाच्या सामान्य चुका, उत्तरपत्रिकेतील सादरीकरणाचे महत्त्व या सर्व बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच परीक्षेच्या काळात मानसिक शांतता राखणे, आत्मविश्वास टिकवणे आणि सातत्याने अभ्यास करणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

हे सत्र अत्यंत संवादात्मक ठरले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विधाते यांनी अत्यंत संयमाने आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले.

हे विशेष व्याख्यान इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित, आसावरी हंचाटे व वीणा कदम यांनी डॉ. सुलभा विधाते यांचे मौल्यवान मार्गदर्शन व वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप औपचारिक आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आसावरी हंचाटे, वीणा कदम सचिन खोडके, सायली गायकवाड, शिरीन काझी व पूनम पांढरे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्या मदतीने अत्यंत उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.