बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शहराच्या भविष्यातील विकासाबाबत नागरिकांचा थेट सहभाग वाढावा, या उद्देशाने प्रभाग क्रमांक ९ मध्ये “मत देण्याआधी, मत मांडू या” हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. बाणेर-बालेवाडी, सुस-महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी या वेगाने शहरीकरण होत असलेल्या परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना एकत्रित स्वरूप देण्यासाठी नागरीकांचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे.
प्रभाग ९ मध्ये पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते व पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, हरित क्षेत्रांचे संवर्धन, तसेच वाढते वायू, ध्वनी व बांधकामजन्य प्रदूषण यासारखे मूलभूत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या सर्व बाबींचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व जीवनमानावर होत असून, आज ठरवली जाणारी प्राधान्यक्रमेच पुढील पाच वर्षांचा विकासाचा मार्ग निश्चित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर Baner Balewadi Pashan Residents Association (BBPRA) आणि Baner Balewadi Nagrik Manch (BBNM) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा जाहीरनामा कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, पूर्णतः नागरिककेंद्री असणार आहे. सामान्य नागरिकांचे अनुभव, समस्या, गरजा, उपाययोजना आणि भविष्यासाठीची दृष्टी यांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात येणार आहे.
निवडणूक लढवणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसमोर प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी बाणेर-बालेवाडी, सुस-महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिक आपले प्रश्न, सूचना व मत Google Form तसेच ई-मेलद्वारे मांडू शकतात. याशिवाय विविध ठिकाणी नागरिकांच्या गटांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. व्यापक सहभागातून तयार होणारा हा नागरकांचा जाहीरनामा प्रभाग ९ च्या शाश्वत, समतोल आणि नागरकाभिमुख विकासासाठी एक ठोस मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Google Form लिंक : https://forms.gle/khWb4azvNa78AkCm9
ई-मेल : bbnmpune@gmail.com
संपर्क:
Baner Balewadi Pashan Residents Association (BBPRA) – 9226422975
Baner Balewadi Nagrik Manch (BBNM) – 9823933399 / 9422067393


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले