February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये ‘सावरकर विचारदर्शन’ ग्रंथसंचाचा भव्य प्रकाशनपूर्व लोकार्पण सोहळा संपन्न,हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांचे आयोजन..

बाणेर :

बाणेर येथील बंटारा भवन येथे ‘सावरकर विचारदर्शन’ ग्रंथसंचाच्या प्रकाशनपूर्व योजनेचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वैचारिक कार्यक्रमाला बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू व ग्रंथसंचाचे संपादक मा. सात्यकी सावरकर, हर घर सावरकर समितीचे अध्यक्ष मा. देवव्रत बापट, हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्याचे मा. आबासाहेब कांबळे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यापीठ भाग कार्यवाह मा. संजय वाघुळदे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते मा. शरद पोंक्षे यांचे प्रभावी आणि विचारांनी परिपूर्ण व्याख्यान. ‘हिंदुराष्ट्र प्रेरक कालातीत सावरकर’ या विषयावर बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची, राष्ट्रनिर्मितीच्या भूमिकेची आणि त्यागमय जीवनदृष्टिची प्रभावी मांडणी केली. पोंक्षेंच्या सशक्त वैचारिक शैलीने सभागृहात उपस्थित सर्व नागरिकांना अक्षरशः भारावून सोडले.

याच प्रसंगी ‘सावरकर विचारदर्शन’ ग्रंथसंचाचे प्रकाशनपूर्व लोकार्पण करण्यात आले. ‘सकाळ प्रकाशन’ निर्मित या ग्रंथसंचात चार महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश आहे

1. हिंदुत्वनिष्ठ सावरकर
2. साहित्यिक सावरकर
3. भाषाभिमानी सावरकर
4. विज्ञाननिष्ठ सावरकर

या ग्रंथसंचाची संकल्पना मा. देवव्रत बापट यांची असून, प्रकल्पाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कार्यक्रमात ग्रंथसंचाची प्रकाशनपूर्व विशेष सवलतीतील नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. पुणेकर वाचकांनी आणि सावरकरप्रेमी नागरिकांनी या ग्रंथांचे मनापासून कौतुक करत मोठा प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक लहू गजानन बालवडकर यांनी सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक, स्वयंसेवक आणि हर घर सावरकर समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची ही केवळ सुरुवात असून, आगामी काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुबक, सुसंगत आणि प्रभावी सूत्रसंचालन अस्मिताताई करंदीकर यांनी समर्थपणे पार पाडले.