September 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रम

सूस :

महाराष्ट्र शासन वनविभाग, वनवृत्त पुणे यांच्या वतीने आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वनपरीक्षेत्र पौड, वनपरिमंडळ दासवे तसेच वनविभाग अधिकारी विद्याधर गांधीले यांच्या सहकार्याने चैतन्य विद्या प्रतिष्ठान, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या सूस शाखेत सुमारे १५० विद्यार्थ्यांसाठी वनसंरक्षण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे सर्व वन अधिकारी तसेच शाळेच्या प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

वनपरिमंडळ अधिकारी, श्री विद्याधर गांधीले, श्री सागर होळे, वनरक्षक श्री आशुतोष शिंदे, श्री भरत सावंत, श्री सागर दाभाडे, तसेच श्री विशाल शेटे, श्री नंदू शेलार आणि सौ. प्रज्ञा बनसोडे यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर मुख्य स्वयंसेवक श्री श्रीनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रफीत दाखवली आणि वनसंरक्षणाचे मार्गदर्शन केले. वन्यजीव मानवी वस्तीत का येतात? “कधी कधी जंगलातील अन्नाची कमतरता, पाण्याची कमतरता किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश झाल्यामुळे प्राणी मानवी वस्तीकडे येतात. तसेच जंगलातील प्रजातींचा विस्तार कमी झाल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाण शोधावे लागते. उदाहरणार्थ, वाघ, ससा, हरण किंवा पक्षी आपल्या अन्नासाठी आणि सुरक्षिततेसाठी गावात येतात.”मानवी वस्तीत आल्यावर माणूस काय करतो? “प्राणी गावात आल्यास वनरक्षक किंवा वन विभाग तत्परतेने त्यांना जाळीतून किंवा सुरक्षित पिंजऱ्यात पकडतात. त्यानंतर योग्य वैद्यकीय तपासणीनंतर आणि त्यांच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करून त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते. यामुळे प्राणी सुरक्षित राहतात आणि मानवी वस्तीत नुकसान किंवा धोका होऊ नये.”

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वनातील प्राणी, पर्यावरण संरक्षण, वन्यजीवांचे महत्त्व आणि संतुलन टिकवण्याचे मार्ग याबाबत सविस्तर माहिती दिली गेली.या कार्यक्रमात इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे वनसंवर्धनाविषयी उत्सुकता दाखवली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम, जबाबदारी आणि संरक्षणाची भावना मिळाली. त्यांना हे उमगले की —

> “एक झाड म्हणजे एक जीवन, आणि प्रत्येक जीवन वाचवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.”

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने पर्यवेक्षक श्री सचिन खोडके, सौ. स्मिता श्रीवास्तव आणि सौ. नेहा माळवदे यांच्या सहयोगाने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन खोडके यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सौ प्रफुल्ला पाटील यांनी केली.

शेवटी सर्व उपस्थितांचे संदेश स्पष्ट होते —

“वन वाचवा, जीव वाचवा — निसर्गाशी मैत्री करा, कारण निसर्गच आपला खरा गुरु आहे.”

 

You may have missed