August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘वसुंधरा अभियान’ संस्थेचा पुढाकार

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शिराळा, नालगाव, बिटरगाव भागात जीवनावश्यक मदत वाटप

धाराशिव, दि. ६ ऑक्टोबर –
परांडा तालुक्यातील शिराळा, नालगाव, बिटरगाव या परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात ‘वसुंधरा अभियान संस्था’ पुढे सरसावली असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला.

पूरग्रस्त भागात भेट दिल्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, “सीना नदीच्या परिसरात अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी दोन ते तीन फुटांनी वाढून घर, जनावरे, शेतीतील ऊस, मका, सोयाबीन यांसारखी सर्व पिके वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतातील मातीसुद्धा वाहून गेल्यामुळे भविष्यात शेती कशी करायची हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.”

 

या परिस्थितीत वसुंधरा अभियानतर्फे जवळपास तीन लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली. त्या रकमेवरून संस्थेने पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा सामान, चादरी, सतरंजी, साड्या, टॉवेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच ज्यांच्या गाई, गुरे, शेळ्या वाहून गेल्या त्या शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत देण्यात आली.

पूरामुळे विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, दप्तर वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर वसुंधरा अभियानने शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार दिला. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू हे या उपक्रमाचे यश सांगून गेले.

वसुंधरा अभियान संस्थेने यापूर्वीही विविध सामाजिक आणि आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य केले असून, 2006 पासून संस्था समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व देणगीदार आणि स्वयंसेवकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

“संकटाच्या काळात एक हात दिलासा देणारा असावा, हीच आमची भूमिका आहे,” असे वसुंधरा अभियानच्या सदस्यांनी सांगितले.

 

You may have missed