औंध :
औंध क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या गंभीर प्रश्नांवरून प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून, मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीस सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी औंध परिसरातील अतिक्रमणे, बाणेर-बालेवाडी भागातील अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुर्दशा, कचरा समस्या, तसेच सुतारवाडी आणि औंध स्विमिंग पूल दुरुस्तीबाबत नागरिकांनी प्रश्न मांडले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे दिपेश गराडे यांनी औंध गावातील अनधिकृत कचरा पेटीचा मुद्दा उपस्थित करत, “हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी केली. यावर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची शाश्वती दिली.
तसेच निलेश जुनवणे यांनी औंध परिसरातील पाण्याची टंचाई आणि ड्रेनेज लाईनवरील झाकणांची होत असलेली चोरी या समस्यांकडे लक्ष वेधले. नाना वाळके यांनी औंध-बोपोडी परिसरातील विविध स्थानिक प्रश्न मांडले, तर रमेश ठोसर यांनी औंध भागातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तसेच EWS इमारतींमधील गुन्हेगारीसाठी होत असलेल्या वापरावर प्रशासकीय कारवाईची मागणी केली.
बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!