बाणेर :
पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष व बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसराचे प्रतिनिधी बाबुराव चांदेरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीएट येथे विशेष भेट घेतली. या भेटीत त्यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करून वाहतुकीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे तसेच परिसरातील सोसायटी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे-बंगळोर राष्ट्रीय महामार्ग (NH48) हा महाराष्ट्राच्या वाहतुकीसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र या महामार्गावरील वाढत्या वाहनसंख्येमुळे बाणेरमधील राधा चौक, म्हाळुंगे आणि सूस गावातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्ककडून पुण्याकडे येणारी हजारो वाहने आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक याठिकाणी अडकून पडते. यामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाया जातो, प्रदूषण वाढते आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून बाबुराव चांदेरे यांनी गडकरी यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी वाहतुकीवर दीर्घकालीन उपाय म्हणून चार ठोस मागण्या केल्या. मान व हिंजवडीकडून येणाऱ्या वाहनांना पुण्यात सहज प्रवेश मिळावा यासाठी मर्सिडीज बेंझ शोरूमजवळ भुयारी मार्ग उभारण्याची मागणी करण्यात आली. बाणेर पॅनकार्ड रोडवरून सूसच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सोय व्हावी यासाठी बिटवाईज कंपनीजवळ उड्डाणपूल उभारावा अशी सूचना करण्यात आली. तसेच म्हाळुंगे गावातून येणाऱ्या वाहनांना थेट बालेवाडीमार्गे पुण्यात प्रवेश मिळावा यासाठी सुमनकीर्ती मारुती सुझुकी शोरूमजवळ आणखी एक उड्डाणपूल आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय वाकड ते सुसखिंडपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व्हिस रोडचे सुयोग्य विकासकाम करण्याचीही मागणी करण्यात आली.
या सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी झाल्यास वाकडपासून सुसखिंडीपर्यंत वाहतुकीची कोंडी आगामी अनेक दशकांसाठी संपुष्टात येईल. नागरिकांचा दीर्घकालीन त्रास दूर होईल आणि पुणे-मुंबई-बंगळोर या महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होईल.
या निवेदनावर तात्काळ प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम यांची या प्रकल्पासाठी नियुक्ती केली. त्यांनी निवेदनातील प्रत्येक मुद्द्याचा सखोल अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याहूनही महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी नितीन गडकरी यांच्या सोबतच्या झालेल्या भेटीत मांडलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रस्तावाला मान्यता देत देहूपासून ते कात्रजपर्यंत एक स्वतंत्र कॉरिडॉर उभारण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. हा कॉरिडॉर म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात आणणारा ऐतिहासिक निर्णय ठरेल.
“बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या वतीने मी जे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे सादर केले, त्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा सर्व पुणेकरांसाठी मोठा दिलासा आहे. गडकरी साहेबांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर तात्काळ त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या विषयावर कार्यवाही सुरू केली. देहू ते कात्रज कॉरिडॉरची घोषणा ही पुण्याच्या वाहतुकीसाठी ऐतिहासिक ठरेल. या प्रकल्पामुळे वाहतुकीची गती वाढेल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि प्रदूषणात मोठी घट होईल. हे पाऊल म्हणजे पुण्याच्या सर्वांगीण विकासाला दिलेले नवे बळ आहे.”
– बाबुराव चांदेरे
(मा.स्थायी समिती अध्यक्ष- पुणे महानगरपालिका)



More Stories
बालेवाडी विमेन्स क्लबतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांतून नारी शक्तीचा गजर
विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरची तपासणी सात दिवसांत, पीएमआरडीए आयुक्तांचे सनी निम्हण यांना आश्वासन..
पुणे विद्यापीठ चौक: ‘फ्लायओव्हर’ की ‘फ्लॉ-ओव्हर’? प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पंचनामा! नगरसेवक सनी निम्हण यांची कारवाईची मागणी