विद्यापीठ :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आरुणि विद्या मंदिर, शिशुविहार प्राथमिक शाळा व विद्यापीठ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या आवारात पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करून उत्सव भक्तिभावाने व सांस्कृतिक जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावर्षीची सजावट “उपनिषदे” या संकल्पनेवर आधारित होती. भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक वारसा, जीवनमूल्ये व ज्ञान यांचे दर्शन घडविणाऱ्या या प्रबोधनपर सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गणरायाच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बालवाडीतील चिमुकल्यांनी स्तोत्रपठण, श्लोक, नृत्य व गाणी सादर करून वातावरण मंगलमय केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण केले, तर शिशुविहार व विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका विजया बराटे, आरुणिच्या मुख्याध्यापिका छाया माळी, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना धार्मिक अनुभवासोबतच उपनिषदांतील तत्त्वज्ञान व जीवनमूल्यांची ओळख करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे तर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव शालेय पारितोषिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते श्री. अ. ल. देशमुख यांनी भेट देऊन सजावटीचे परीक्षण केले.
भावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी “गणपती बाप्पा मोरया – मंगलमुर्ती मोरया” या घोषणांसह कृत्रिम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करून उत्सवाची सांगता केली. ✨



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!