बाणेर :
दिल्ली येथे राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार हजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनेत्रा वहिनींच्या उपस्थितीवरून आमदार रोहित पवारांनी टीका केली होती. मात्र, या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
समीर चांदेरे म्हणाले, “रोहित पवारांनी आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा आणि मग इतरांवर टीका करावी. स्वतःचं राजकारण कोसळत असल्याची भीती वाटली की ते सतत अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींवर बोट ठेवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात.”
ते पुढे म्हणाले, “सुनेत्रा वहिनींची कोणाशी भेट झाली याला राजकीय रंग देणे म्हणजे केवळ कांगावा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था गेल्या शतकभरापासून देशभक्ती, राष्ट्रभान, संघटनशक्ती आणि समाजसेवेचं कार्य करत आहे. लाखो स्वयंसेवक नि:स्वार्थ भावनेने देशासाठी कार्यरत आहेत. अशा संस्थेशी संवाद साधणं ही अभिमानाची बाब आहे, त्यावरून टीका करणं हे चुकीच्या मानसिकतेचं लक्षण आहे.”
रोहित पवारांवर थेट टीका करताना समीर चांदेरे म्हणाले, “स्वतःच्या पक्षातील गोंधळ मिटवता येत नाही आणि पुरोगामित्वाच्या गप्पा मात्र मोठ्या मारल्या जातात. महाराष्ट्राला नुसते ‘फेसबुकी’ पुरोगामी नको आहेत, तर प्रत्यक्ष काम करणारे नेते हवे आहेत. अजितदादांनी सत्ता घेतली ती जनतेच्या प्रश्नांना तोडगा काढण्यासाठी, विचारधारा विकण्यासाठी नाही. वजन नसलेला माणूसच आवाज चढवतो, आणि रोहित पवारांचं हेच सध्या सुरू आहे.”
शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “स्वतःच्या निष्क्रियतेवर झाक घालण्यासाठी इतरांवर आरोप करणं थांबवा. महाराष्ट्राची जनता रोहित पवारांच्या पोकळ टीकांना आता काहीही किंमत देणार नाही.”


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन