बाणेर :
वसुंधरा अभियानाने यंदाही आपल्या परंपरेला कायम ठेवत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुकाई टेकडी, बाणेर येथे कडुलिंबाचे वृक्ष लावून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. २००६ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत वसुंधरा अभियान नियमितपणे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्य करत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला एक कडुलिंबाचे झाड लावून सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरणाबद्दलची बांधिलकी जपली जाते.
वसुंधरा अभियानाच्या या उपक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ८०-९० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत अनेकजण वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या कार्यात सक्रिय योगदान देतात. संस्थेमार्फत देशी आणि स्थानिक प्रजातींच्या बिया जमा करून त्यांची रोपे तयार केली जातात. त्यानंतर या सर्व देशी प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाते. केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे आणि पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी विविध वृक्ष प्रकल्प साकारणे यावरही संस्थेने भर दिला आहे. याच प्रयत्नांमुळे बाणेर येथील तुकाई टेकडीवर सिमेंटच्या जंगलात एक समृद्ध आणि जैवविविधतापूर्ण जंगल उभे राहिले आहे. येथे साडेचारशेहून अधिक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने वसुंधरा अभियानाने एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. संस्थेने नागरिकांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे जतन करावे, असे आवाहन केले आहे.
बाणेरच्या तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियानाने आतापर्यंत ५० हजार वृक्षांची लागवड केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने संस्थेला प्रतिष्ठित ‘श्री शिवछत्रपती वनश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. वसुंधरा अभियानाचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.


More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*