पुणे :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत लोकशाही मूल्यांची ओळख करून घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, संघभावना तसेच लोकशाहीबद्दल आदर निर्माण व्हावा, निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी आणि लोकशाही संस्कार अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक आयोजित करण्यात आली होती.
उमेदवारी अर्ज मागविणे, अर्जांची छाननी, वर्गनिहाय प्रचार, मतपत्रिका छपाई, गुप्त मतदान, मतदारांच्या बोटाला शाई लावणे, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे अशा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह तथा माजी मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते राज्यपाल म्हणून निवड झालेल्या सोनाली घोडके यांना शपथ देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आदित्य गटकळ, उपमुख्यमंत्री जागृती मोरे आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांनाही यावेळी पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संताजी चव्हाण, राजेंद्र पाटेकर, वैशाली सैंधाणे, योगेश्वर चव्हाण, मनोहर निकम, तेजस्विनी निरगुडे, संध्या आवेकर, रेश्मा पुरी, पल्लवी अभंग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!