औंध :
औंधरोड, बोपोडी भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लोकांचा वेळ वाया जात आहे. याबाबत उपाय योजना करण्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच वाहतूक शाखेचे प्रभारी मनोज पाटील यांच्याकडे केली.
याबाबतचे पत्र त्यांनी आज मनोज पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले. लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन या भागातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी या भेटीत दिले.
सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, औंध रोड आंबेडकर चौक येथे नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच या भागात सांगवी, स्पायसर कॉलेज या भागातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून येथील मुळा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल औंधरोड येथील चंद्रमणी संघ येथून सुरु होतो. या पूलावरून प्रवास करणे गैरसोयीचे होत असल्याने पुलावर अत्यंत कमी वर्दळ आहे.
औंधरोड कडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना या पुलावरून जाण्यासाठी डिव्हायडर नसल्याने पुणे विद्यापीठाकडून वळसा घालून यावे लागते. हा त्रास वाचवण्यासाठी लोक विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवासासाठी जातात. यामुळे या रस्त्यावर गर्दी होते.
त्याचप्रमाणे सांगवी कडून येणारी वाहने औंधरोड येथे चंद्रमणी संघाजवळ येतात. पुणे विद्यापीठाकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर अगोदरच गर्दी झालेली असते अशावेळी येथे बॉटल नेक तयार होऊन पुन्हा या रस्त्यावर गर्दी वाढते. जवळच येथे औंध रोडचा पीएमपीएमएलचा बस थांबा तसेच रिक्षा स्टँडही आहे. यामुळे आंबेडकर चौकातून रस्ता ओलांडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होतो.
याप्रमाणेच बोपोडी कडून येणारी ब्रेमेन चौक व खडकी स्टेशन परिसराकडे जाणारी वाहने औंधरोड आंबेडकर चौकात येतात यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याप्रमाणेच खडकी स्टेशन पासून रेंजहिल्सकडे वळताना तसेच खडकी पोलिस स्टेशन जवळील बोगद्याजवळ नेहमी गर्दी होऊन वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. दररोज होणाऱ्या या त्रासाला वाहनधारक वैतागले आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यापुढेही एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
तरी कृपया आपण पाहणी दौरा आयोजित करून औंधरोड, बोपोडी, खडकी येथील वाहतूक समस्येचा आढावा घ्यावा व येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी